|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बुवा-भतिजा साथसाथ!

बुवा-भतिजा साथसाथ! 

बहनजी-अखिलेश साथसाथ !

वृत्तसंस्था/लखनौ

देशाचे पंतप्रधान निश्चित करण्याचे सामर्थ्य असणाऱया उत्तर प्रदेश राज्यात शनिवारी समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसप) युतीची अधिकृत घोषणा झाली. दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकी 38 जागांवर निवडणुका लढवितील. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा अमेठी आणि रायबरेली मतदारसंघापासून दोन्ही पक्ष अलिप्त राहतील, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केले. 

बसप प्रमुख मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मायावती म्हणाल्या, देशहिताबरोबर जनहितासाठी दोन्ही पक्ष मतभेद विसरून एकत्रित आले आहेत. दोन्ही पक्षांची युती विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिल.  ही युती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडवेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रित लढलो असतो तर भाजपला सत्तेपासून रोखता आले असते, असा दावाही त्यांनी केला.

भाजप-काँग्रेस एकाच माळेचे मणी : मायावती 

काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम देशावर आणीबाणी लादली. आता भाजप सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेचे मनी असून, आमचा दोघांनाही विरोध आहे. दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळात संरक्षण खरेदी घोटाळे झाले आहेत. राफेल विमान खरेदी गैरव्यवहारामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे भाकितही मायावती यांनी केले.

काँग्रेसबरोबरील आघाडीचा उपयोग नाही : मायावती 

यावेळी मायावती यांनी मतांचे गणित मांडले. त्या म्हणाल्या, आम्हाला काँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा होत नाही. आम्ही सोडलेल्या मतदारसंघात आमचे मतदान काँग्रेसला मिळते; पण त्यांनी आमच्यासाठी सोडलेल्या जागांवर आम्हाला कोणताही लाभ होत नाही. उलट आमचे मतदान कमी होते. 1996मध्ये आम्हाला याचा अनुभव आला आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसबरोबर आघाडीचा उपयोग होत नाही, असेही मायावती यांनी स्पष्ट केले.

भाजपविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकवटतील : अखिलेश

भाजपने मायावती यांच्याविरोधात अत्यंत हीन पातळीवर टीका सुरू केली होती. तेव्हाच बसपाबरोबर युतीचा निर्णय घेण्यात आला होता. आता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे भाजपच्या अन्यायाविरोधात लढा देतील. आमची युती केवळ निवडणुकीसाठी नव्हे तर भाजपच्या अन्यायविरोधात आहे, असा दावा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. सपाच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. यापुढे मायावती यांचा अवमान हा माझा अवमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

23 वर्षांनंतर राज्यात पुन्हा सपा-बसप युती

 उत्तर प्रदेशमध्ये 1993च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सपा-बसपा युती झाली होती. त्यावेळी बसपचे नेतृत्त्व काशीराम यांच्याकडे होते. 320 पैकी सपा-बसपचा अनुक्रमे 109, 67 जागांवर विजय झाला होता. 2 जून 1995 मध्ये लखनौ येथील गेस्ट हाऊसमध्ये सपाच्या समर्थकांनी बसप आमदारांना मारहाण केली होती. यानंतर दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली होती. मुलायमसिंह यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. भाजपच्या समर्थनावर मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या.

ही तर शत्रुंची युती : अरुण जेटली

दोन्ही पक्षांच्या मते आणि उद्देश भिन्न असून, ही दोन शत्रुंची युती आहे, अशा शब्दात भाजप नेते अरुण जेटली यांनी सपा-बसपा युतीच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. यापूर्वी चरणसिह चौधरी, व्ही. पी. सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांनीही युती केली होती; पण स्वहितामुळे ती संपुष्टात आली होती. भाजप नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे सुरूवातीला 24 मित्र पक्ष होते. आता त्याची संख्या 35 झाली आहे. निवडणुका या कधीच मतांच्या गणितांवर जिंकल्या जात नाहीत, हे सपा-बसपला लवकरच समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे युवराज असो की बंगालची दीदी, आंध्रप्रदेशचे बाबू आणि उत्तर प्रदेशच्या बहनजी यांची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे. सर्वजण निवडणुकीनंतर आपल्या तलवारी काढतील, असेही जेटली यांनी सांगितले.