|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

सवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब 

नवी दिल्ली :

आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. आता राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याने या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होणार आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्यांना 10 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकरी आणि शिक्षणात आर्थिकदृष्टय़ा मागासांना 10 टक्के आरक्षण मिळावे म्हणून हे विधेयक 8 जानेवारीला लोकसभेत मांडण्यात आले होते. लोकसभेतील 326 खासदारांपैकी 323 जणांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यानंतर ते चर्चेअंती लोकसभेत संमत झाले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी  राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आले होते. तेथे या विधेयकावर बरीच चर्चा झाली. मात्र, काही प्रादेशिक पक्ष वगळता कोणीही फारसा विरोध न केल्यामुळे राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले होते. विधेयकाच्या बाजूने 165 तर 7 मते विरोधात पडली होती. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना भाजपची कसोटी पणाला लागली होती. मात्र ती कसोटी भाजपने पार केली आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. विधेयकावरील राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे आता आरक्षण मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.