|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुसंस्कारित मुलं घडवणारी ‘आई’

सुसंस्कारित मुलं घडवणारी ‘आई’ 

सदाशिव आंबोशे/ कागल

श्रीमती सकिनाबी मियाँलाल मुश्रीफ या शुक्रवारी वयाच्या 93 व्या पैगंबरवाशी झाल्या. त्याप्रसंगी त्यांची तीन मुले व तीन मुलींकडे सांत्वनासाठी येणारा त्यांचा गोतावळा आणि जवळच्या कार्यकर्त्यांमधून एकच चर्चा सुरू होती की त्या एक संस्कारशील ‘आई’ होत्या, असा एकच सुर अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळाला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार हसन मुश्रीफ, सेवानिवृत्त पोलिस महासंचालक शमशुद्दीन मुश्रीफ आणि प्रगतशील शेतकरी अन्वर  मुश्रीफ अशी एकापेक्षा एक संस्कारशिल मुलं या आईनं घडवली. आज त्यांच्या जाण्याने त्यांचा संपूर्ण गोतावळा तर पोरका झालाच शिवाय मुश्रीफ कुटूंबियांवर प्रेम करणारी जनताही पोरकी झाली आहे. गेले दोन दिवस आपल्या आईचे आठवणीतील अनेक प्रसंग आमदार हसन मुश्रीफ सांगत असताना त्यांच्या डोळय़ातून टपकन पाणी यायचे..!

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारे कागल शहर… या शहरातील मुश्रीफ हे एक सधन शेतकरी कुटूंब… मियाँलाल मुश्रीफ हे तर कागलचे पहिले उपनगराध्यक्ष होते. ते बापूजी म्हणूनच परिचित होते. त्यांच्याशी सकिनाबी यांचा विवाह झाला. सर्व कांही सुखाचे असताना या पहाडी व्यक्तीमत्वाचा 46 वर्षापूर्वी निधन झाले आणि संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी ही सकिनाबी मुश्रीफ यांच्यावर येवून पडली. शमशुद्दीन मुश्रीफ हे 21 वर्षाचे तर हसन मुश्रीफ 17 वर्षाचे होते. त्याखालोखाल अन्वर मुश्रीफ होते. त्यापध्दतीने तीन मुली होत्या. पती गेल्याच्या आघातातूनही सावरत या धिरोधात्त आईने मुलांना घडविले. त्यांचा चांगल्या पध्दतीने सांभाळ करीत तिन्ही मुलींची आणि मुलांची लग्न समारंभ, पै-पाहुण्यांना सांभाळत आपल्या संस्काराचा गाडा हाकला.

शमशुद्दीन मुश्रीफ हे तर महाराष्ट्र पोलिस दलातील करारी आणि शिस्तप्रिय अधिकारी बनले. त्यांनी पोलिस दलात आपला वेगळा ठसा उमठविला. आज ते सेवानिवृत्त अधिकारी आहेत. मात्र आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार मुक्त चळवळीत काम करतात. आमदार हसन मुश्रीफ यांचे कर्तृत्व तर सर्वज्ञात आहे. एका अल्पसंख्याक घराण्यात जन्माला येवूनही त्यांनी 1999 ते आजअखेर पाच विधानसभा निवडणूका लढविल्या त्यातील सलग चार विधानसभा निवडणूका जिंकून इतिहास रचला. राज्याच्या मंत्री मंडळात 14 वर्षे मंत्री म्हणून ते वावरले. अनेक खात्यांची जबाबदारी पेलताना गोरगरीब जनता ही केंद्रस्थानी मानून काम केले हे आईच्याच शिकवणीचा एक भाग आहे. आमदार हसन मुश्रीफ हे जिल्हय़ाच्या आणि राज्याच्या राजकारणात भले आक्रमक असतीलही पण त्यांनी आपली पातळी कधीही सोडली नाही. हे संस्कार त्यांना त्यांच्या आईकडूनच त्यांना मिळाले आहेत. तर त्यांचा धाकटा मुलगा प्रगतशील शेतकरी अन्वर मुश्रीफ हे फारसे राजकारणात सक्रीय नसले ते कागलच माजी नगरसेवक आहेतच शिवाय त्यांचे गटा-तटाच्या राजकारणापलिकडे जावून सर्वच गटाशी जवळचे ऋणानुबंध आहेत.

आमदार हसन मुश्रीफ येणाऱया प्रत्येकाला आपल्या आईविषयी भरभरून सांगत होते. आमदार मुश्रीफ सांगत होते, अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती अतिशय चांगली होती. औषधाची गोळी कधी चुकवली नाही. कागल शहरात त्यांच्या आईचे सर्वत्र श्रध्दांजली वाहणारे फलक लागले आहेत. फलकावरील त्यांचा फोटो पाहून सकिनाबी मुश्रीफ आणि आमदार हसन मुश्रीफ यांचा चेहऱयातील साम्य पाहून पाहणारे सहज बोलून जायचे अरे… साहेब… त्यांच्या आइं&च्या तोंडातून पडल्यासारखे ..!  गैबी चौकातील जुन्या घरात त्या राहत होत्या. आमदार हसन मुश्रीफ हे बाहेर जाताना आईंना भेटूनच निघायचे. मंत्रीपदाच्या काळात आणि आजही आमदार मुश्रीफ यांची धावपळ असतेच असते, त्यातूनही ते वेळ काढून आईंची भेट घेवून चर्चा करीत. कोणत्याही निवडणूकीचा अर्ज दाखल करताना ते आईंचा आशिर्वाद घेवूनच ते जात. ‘तू निवडून येणार’ असा आशिर्वादच त्या द्यायच्या… त्यामुळे आमदार मुश्रीफ हे बिनधास्तपणे समाजकारण आणि राजकारणात वावरताना दिसतात, हे त्याचेच एक कारण असू शकते हे आता लक्षात येते. त्यांनीही एक आपल्या कार्यकर्त्यांना यातून संदेशच दिला आहे. आई-वडीलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे.

परवाचीच एक आठवण सांगता येईल कासारीपैकी माळवाडीत जाधव कुटूंबियांवर एका-पाठोपाठ एक असे नियतीचे आघात झाले. त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ हे सांत्वनासाठी गेले. त्या घरातील मुलग्याला आपल्या कारखान्यात नोकरी देताना सांगीतले, आई-वडील, भावाची पत्नी, त्याची दोन मुले आणि तुझ्या मुलांची जबाबदारी तू घ्यायची या अटीवरच त्यांनी नोकरी देवू केली. ही शिकवण कुठल्या क्लासमध्ये मिळत नाही तर ही फक्त आणि फक्त आईकडूनच मिळते. म्हणूनच श्रीमती सकिनाबी मुश्रीफ या नुसत्या आई नाहीत तर त्या संस्कारशिल मुलं घडवणाऱया ‘आई’ आहेत, असेच म्हणावे लागेल..!