|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » श्री विठ्ठल रुक्मिणीच्या ऑनलाईन दर्शन बुकींगसाठी शंभर रुपये

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या ऑनलाईन दर्शन बुकींगसाठी शंभर रुपये 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उपसमितीच्या बैठकीत निर्णय

पंढरपूर  / वार्ताहर

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवारी उपसमितीच्या बैठकीत ऑनलाईन दर्शन बुकींग करणाऱया भाविकांना नाममाञ शंभर रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे.

पंढरपुरात श्री विठ्ठल व रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वर्षांकाठी लाखो भाविक येत असतात. दर्शनासाठी मंदिर समितीकडुन दर्शन रांग, व्हीआयपी दर्शन व ऑनलाईन दर्शन च्या माध्यमातुन सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणा-या प्रत्येक भाविकांच्या सोयीनुसार दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी यासाठीची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना रांगेत तासनतास थांबावे लागत होते. भाविकांची दर्शन घेण्याची गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनाचे बुकींग करण्याची सोय गेल्या काही वर्षांपासुन सुरू केली आहे. या सुविधेमुळे घाई गडबडीने येणारे भाविक गावांकडुन येताना आपल्या सोयीच्या दिवशी दर्शन घेण्याची तारीख मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन बुक करुन घेत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या वेळेनुसार व सोयीनुसार दर्शन भेटत आहे. परंतु या सुविधेतुन मंदिर समितीस कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन बुकींग व्यवस्थेचा फायदा फक्त नेट पॅफे चालविणा-या व्यावसायिकांनाच होत होता. ऑनलाईन बुकींग दर्शन व्यवस्थेस चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भाविकांकडुन मिळत असल्याचे वर्षभर निदर्शनास आले आहे. दर्शनासाठी पैसे घेऊन सोडण्याच्या घटना काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे मंदिर समितीकडुन दर्शनासाठी शुल्क आकारावे, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु शुल्क दर्शनाला वारकरी संप्रदयातील काही महाराज मंडळीतुन विरोध करण्यात येत होता. असे असताना देखील मंदिर समितीच्या उपसमितीच्या बैठकीत सशुल्क दर्शनाचा निर्णय घेण्यात आल्याने वारकरी संप्रदयातील काही लोकांकडुन  नाराजीचे वातावरण दिसत आहे.