|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘क्रांती, कृष्णा’ची गट कार्यालये पेटवली

‘क्रांती, कृष्णा’ची गट कार्यालये पेटवली 

वार्ताहर/ पलूस, भवानीनगर

उसाची पहिली उचल 2300 रुपये जमा झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. आज सांगली जिह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे रेठरेहरणाक्ष येथील गट कार्यालय पेटवून दिले.

   स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांचे ऑफिस बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे. साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही साखर कारखान्यांनी एफआरपी जमा केलेली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या एफआरपीत मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन कऱू, असा
गर्भित इशारा दिला होता. सांगली जिह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱयांच्या खात्यावर 2300 रुपये वर्ग केले आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिह्यातील  साखर कारखान्यांची गट कार्यालये कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण एफआरपी मागणी करण्यात आली होती. सांगली जिह्यातील साखर कारखान्यांनी केद्र सरकारचा एफआरपीचा एकरकमी कायदा असताना 2300 रुपये भाव म्हणजे शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तो कदापी खपवून घेणार नाही. आम्हाला एफआरपीची पूर्ण रक्कम पाहिजेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष अध्यक्ष भागवत जाधव यांनी केली.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सयाजी मोरे यांनी, ही फक्त ठिणगी आहे. ज्वालामुखी अजून बाकी आहे अशा शब्दात आंदोलनाची व्याप्ती वाढवणार असल्याचे संकेत दिले. शेतकऱयांचा अंत पाहू नका मराठा, विदर्भाबरोबर ऊस पट्टय़ात देखील आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱयांवर आली असल्याचे सांगितले.

क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कुणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता केवळ शेतकऱयांचे हित डोळय़ासमोर ठेवून एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम आम्ही जमा केली आहे. गट कार्यालये पेटवण्याचे काम जे कोणी अज्ञातांनी केले आहे. त्यांना फक्त स्टंट करायचा आहे. शेतकऱयांचे हित कशात आहे हे त्यांना बघायचे नाही. वेळोवेळी एफआरपीच्या रकमेबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळेना. बँका जेवढी उचल देतील तेवढीच रक्कम आम्ही शेतकऱयांच्या खात्यावर जमा केली आहे.