|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नेत्यांच्या वाढत्या दौऱयांची मांदियाळी

नेत्यांच्या वाढत्या दौऱयांची मांदियाळी 

संजय गायकवाड / सांगली

लोकसभा निवडणूकीचे पडघम आता  वाजू लागले आहेत.  मार्चच्या पहिल्या आठवडयात सार्वत्रिक निवडणूकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने भाजपा आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जिल्हयातील दौरे वाढले आहेत.  यंदाची लोकसभा अतिशय अटीतटीची होण्याची चिन्हे असून प्रत्येक पक्षाने  लोकसभेची एक एक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यात सांगलीचाही समावेश आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,त्याअगोदर अजित पवार, यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा.राम शिंदे, दिवाकर रावते आदी अनेक नेतेमंडळीचे जिल्हयात दौरे झाले. आता 24 जानेवारीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगलीच्या दौऱयावर येत असून लोकसभा निवडणूकीच्या तारखेची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

पाच राज्यांतील मोठया पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या भाजपाने विशेषतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक अतिशय गांभिर्यांने घेण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने त्यांच्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच वातावरणनिर्मिती करण्याच्या दृष्टीने आणि पक्ष कार्यकर्त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाची बडी मंडळी देशभर दौरे करताना दिसत आहेत. पंतप्रधानांची सांगलीला सलग्न असलेल्या सोलापूर जिल्हयात मोठी जाहीर सभा झाली. त्यापाठोपाठ पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हेही सांगलीच्या दौऱयात येत आहेत.

 महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे सांगली जिल्हयाचे दौरे वाढले आहेत. त्यापुर्वी मुख्यमंत्री आणि गडकरी यांचेही जिल्हयात दौरे झाले.सांगलीच नव्हे तर शेजारील कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्हयातही नेत्यांचे वाढते दौरे सुरू आहेत. शरद पवार यांच्यापाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही हेही कोल्हापूरच्या दौऱयावर येत आहेत.

आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटयाला कोणत्या जागा येणार हे लवकरच स्पष्ट होईल, भाजपा सेनेची युती होणार की नाही याबाबत अजूनही काही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे युती फिस्कटली तर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ येऊ नये. तसेच वातावरणनिर्मिताचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांनी  यंदाच्या लोकसभेला कोणताही हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, सातारा, माढा या सहाही ठिकाणी तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत. राजकीय साठमारीत  सहाही जागा सर्वच पक्षांसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यातूनच अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत. नेत्यांच्या दौऱयांची मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे लोकांना निवडणूकीची चाहूल लागली आहे. गेली चार वर्ष गायब झालेली नेतेमंडळी लोकांना दर्शन देऊ लागली आहेत. विकासकामांच्या उदघाटनांचा आणि घोषणांचा धडाका सुरू आहे.बेरजेचे राजकारण करत नेतेमंडळी सावधपणे पावले टाकताना दिसत आहेत.

लोकसभा तोंडावर असल्याने राज्यातील व देशातील प्रमुख नेतेमंडळीचे दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार आणि त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यापुर्वीच सांगलीमध्ये महापालिकेच्या निवडणूकीचा धुरळा उडाला होता. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपा अशा थेट लढतीत भाजपाने मनपावर झेंडा फडकविण्यात यश मिळविले. मैत्रीपुर्ण लढती आणि अन्य काही बारिकसारीक चुकांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपाने हिसकावून घेतला. यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेली. वीस वर्षात प्रथमच एकहाती सत्ता मिळविणारी भाजपा मनपाच्या सत्तेत आली. त्यामुळे शहरात नवीन काही तरी होईल. असे वाटत होते. पण गेल्या चार पाच महिन्यात सत्ताधारी भाजपाकडून शहरात एकही नवीन आणि लोकांनी तोंडात बोटे घालावीत. असे एकही काम झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसची मंडळीही आता महापालिकेत काय चाललय ते पहा  असे म्हणू लागली आहेत. छोटया मोठया आंदोलनाच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसची मंडळी सक्रीय झाली आहेत. शिवसेनेच्या नेत्यांचेही दौरे सुरू आहेत.

काँग्रेसचा उमेदवार कोण यावरही बरीचशी राजकीय गणिते अवलंबून आहेत. सांगलीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या  राज्यपातळीवर सभा सुरू आहेत.एकूणच काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांचे जिल्हानिहाय दौरे सुरू आहेत. निवडणूकीची सर्वानाच उत्सुकता आहे. सांगलीमध्येही लोकांना लोकसभेचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय नेतेमंडळीबरोबरच लोकही नेत्यांच्या दौऱयांकडे लक्ष ठेवून आहेत.

Related posts: