|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भ्रष्ट नगरसेवकांना हाकलले

भ्रष्ट नगरसेवकांना हाकलले 

वसिम शेख/ कुडाळ

जनतेतून नगराध्यक्ष म्हणून जनतेच्या आशीर्वादावर मी निवडून आले, उर्वरित 14 नगरसेवकांना एकत्र करून पाचगणीच्या विकासासाठी नेहमीच झटत राहिले. जिथे विकास तेथे लक्ष्मी कराडकर हे सूत्र माझ्या आयुष्यात नेहमीच मी पाळत आले आहे. मात्र पाचगणीच्या जनतेच्या जीवावर निवडून आलेल्या नगरसेवक केवळ खाबुगिरी व जिथे पैसा मिळेल तिथं टक्केवारीसाठी मागे लागणाऱया 9 नगरसेवकांना मी स्वतःच माझ्या राजकीय कारकिर्दीत हाकलून दिले असल्याचे नगराध्यक्ष लक्ष्मी कऱहाडकर यांनी सांगितले.

पाचगणीच्या कचरा डेपोवर काल अचानक नऊ नगरसेवकांनी कचरा डेपोच्या कारभारावर हल्लाबोल केला व ठेकेदारांना कचरा डेपोच्या कारभाराबाबत स्टिंग ऑपरेशन करत विचारणा केली. या सर्व प्रकारावर पाचगणीच्या विद्यमान नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

विकासकामांना घालतायेत खो

लक्ष्मी कऱहाडकर पुढे म्हणाल्या, ज्या जनतेने नगरसेवक म्हणून त्यांना निवडून दिले ते स्वतःच कॉन्ट्रक्टर बनू पाहत असून अनाधिकृत बांधकाम करत आहेत. कवडीमोल किमतीत जागा घेऊन पाच घळीतल्या गोरगरीब जनतेला लाखो रुपयात जागा विकून व्याजाचे धंदे व इतर पतसंस्थेतून 30 ते 35 टक्के व्याजाने कर्ज प्रक्रिया करून गोरगरीबांना अनाधिकृत बंगले बांधून देण्याचा उद्योगधंदा सध्या नगरसेवकांकडून सुरू झाला आहे. या सर्व बांधकामावर आम्ही अनधिकृत बांधकाम केल्याच्या नोटीसा काढल्या म्हणून त्याचा राग मनात धरून विकासकामांना ब्रेक लावण्याचा प्रकार सुरु आहे. तसेच चांगल्या कामांना अडवणे, ठेकेदारांकडून टक्केवारी मागणी असे अनेक उद्योगधंदे हे बुद्धीभ्रष्ट नगरसेवकांनी सुरू केली आहेत.

अपप्रवृत्तींना धडा शिकवणार

मात्र, पाचगणीच्या जनतेने मला नगराध्यक्षपदावर बसवले असून गेल्या पंधरा वर्षांत येथील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे. मालमत्तेची व जनतेची फसवणूक करणाऱयांना मी कधीच माफ करणार नसून त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. जनतेचा आर्शीवाद व विश्वास माझ्याबरोबर असल्याने मी अशा अप्रवृत्तींना कधीच भीक घातली नाही. आगामी काळात जनतेच्या आर्शीवादाने अपप्रवृत्तींना कायमचा धड शिकवणार आहे. अशा नगरसेवकांना मी माझ्यापासून स्वतः दूर केला असल्याचा खळबळजनक खुलासा विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱहाडकर यांनी केला.