|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अन्नोत्सवात लाभतेय लज्जतदार खाद्यपदार्थांची पर्वणी

अन्नोत्सवात लाभतेय लज्जतदार खाद्यपदार्थांची पर्वणी 

बेळगाव  / प्रतिनिधी

राजस्थानी घी जिलेबीबरोबरच कोकणातला भरलेला बांगडा, पंजाबी छोले असे सर्व चमचमीत व लज्जतदार पदार्थ खवय्यांना अन्नोत्सवामध्ये आकर्षित करीत आहेत. सीपीएड् परिसरात सुटलेला खमंग सुवाद आपोआपच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर घेऊन जात आहे. यामुळे शनिवारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची तुफान गर्दी लोटली होती.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘रोटरी अन्नोत्सव’मध्ये देशभरातील खाद्यपदार्थ एकाच छताखाली मिळत आहेत. खाद्यपदार्थांचे 100 हून अधिक स्टॉल या महोत्सवात मांडण्यात आले आहेत. शाकाहारी-मांसाहारी खाद्यपदार्थ, गोडपदार्थ, चमचमीत हलके-फुलके पदार्थ या अन्नोत्सवाची लज्जत वाढवत आहेत.

चमचमीत मासळीचा आस्वाद

अन्नोत्सवामध्ये हॉटेल बगीचा व समुद्रच्या स्टॉलवर चमचमीत मासळीचा स्वाद घेता येत आहे. कोकणातील मासळीची चव बेळगावमध्ये चाखण्याची संधी या हॉटेलनी उपलब्ध करून दिली आहे. बांगडय़ाबरोबच सुरमई, पापलेट, कोळंबीचे विविध प्रकार खवय्यांच्या चिभेची चव पुरवत आहेत. गुलाबी थंडीमध्ये मासळीचे सुप वेगळाच स्वाद देऊन जात आहे. त्यामुळे खवय्यांची पहिली पसंती या स्टॉलला मिळत आहे. याचबरोबर शाकाहारी व मांसाहारी पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत.

फायर पिझ्झा आकर्षणीय

अन्नोत्सवामध्ये बीबीसी या स्टॉलवर असलेला फायर पिझ्झा आकर्षणीय ठरत आहे. पिझ्झा तयार करून त्याला वरून आगीची झळ देण्यात येत आहे. त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद येत असल्याचे खवय्ये सांगत आहेत. याचबरोबर छोले, घेवर, रबडी जिलेबी, 24 कॅरेट हलवा, हलवा येथे उपलब्ध आहे.

भन्नाट आईस्क्रीम

आजवर आपण विविध प्रकारच्या आईस्क्रीमची चव चाखली आहे. परंतु प्रुटोगेन या स्टॉलवर मोदक आईस्क्रीम, रबडी मिस्क, पुरणपोळी, कुंदा, पान, पेरू, शेंगा चिक्की आईस्क्रीम येथे उपलब्ध आहेत. कोणत्याही फ्लेवरचा वापर न करता हे आईस्क्रीम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा भन्नाट चवीचे आईस्क्रीम खवय्यांना वेगळाच आस्वाद देत आहेत.