|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पैसा हाच सर्वस्व म्हणणे चुकीचे ठरेल!

पैसा हाच सर्वस्व म्हणणे चुकीचे ठरेल! 

प्रतिनिधी/ बेळगाव

‘सर्व जग सुखी होवो’ अशी संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात मांडली आहे. सद्गुरुंनी तोच धागा पकडून सर्वांचे जीवन सुखी व्हावे आणि संपूर्ण हिंदुस्थान सुखी व्हावा हा संकल्प केला. जीवनविद्या मिशनद्वारे हे काम सुरू असून यासाठी हजारो कार्यकर्ते झटत आहेत. गेल्या 63 वर्षांपासून निरपेक्षपणे हे काम सुरू आहे, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

जीवनविद्या मिशन आयोजित 52 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा-2019 मध्ये प्रबोधक प्रल्हाद पै यांचे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’ या विषयावर प्रबोधन झाले. लिंगराज कॉलेज मैदानावर शनिवारी हा सोहळा झाला. जीवनविद्या मिशनच्या कार्याचा परिचय देताना प्रल्हाद पै यांनी जीवनविद्या ही सर्वांगांनी जीवनास उपयोगी असल्याचे सांगितले. सुख आणि आनंद या शब्दात प्रचंड शक्ती आहे. प्रपंच्यामध्ये सर्वांना सुखच हवे असते. तर परमार्थामध्ये सर्वांना देव (परमेश्वर) पाहिजे असतो. यासाठी देव पाहिजे म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे, असे पै म्हणाले.

सुख म्हणजे नक्की काय? हे जाणून घेताना पैसा हाच सर्वस्व म्हणणे चुकीचे ठरेल. सुखी होण्यासाठी जीवनात पैशांची आवश्यकता आहे. सद्गुरुंनी नामस्मरणाप्रमाणेच पैशाला महत्त्व दिले आहे. परंतु पैसा म्हणजे सुख नसून सुखसोयी आहे. पैशांनी मनुष्याच्या मुलभूत गरजा भागविता येतात. मात्र नंतर याच पैशांच्या वापराचे चैनीत रुपांतर होते. नंतर गैरसोयी वाढतात. यात पैशांचा दोष नसून मनुष्याचा आहे. यामुळे ‘पैसा भरपूर कमवा मात्र भानावर रहा’ असा संदेश सद्गुरुंनी दिला आहे. प्रामाणिकपणे पैसा कमवा, अशी संकल्पना सद्गुरुंनी मांडली असून सद्गुरुंच्या या संकल्पनेनुसार जीवन जगल्यास सुख म्हणजे नक्की काय असते, हे समजून येईल, असे प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी हरिपाठ, संगीत जीवनविद्या यासह ज्ञानेश्वर माउलीचे स्मरण करण्यात आले. प्रबोधक प्रल्हाद पै यांच्यासह उद्योजक सुरेश पाटील, डॉ. केतकी पावसकर, सुभाष देशपांडे, जीवनविद्या मिशन बेळगावचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन आदींच्या हस्ते सद्गुरुंचे लेख व अनुभव या स्मरणिकेचे आणि जीवनविद्येच्या त्रैमासिकाचे  प्रकाशन करण्यात आले.

डॉ. दिलीप पटवर्धन यांनी स्वागतपर भाषणात जीवनविद्या मिशनच्यावतीने राबविण्यात येणाऱया अभियानाची माहिती दिली. तसेच अवयवदान अभियानात भाग घेण्याचे आवाहन केले. मृणाल खणगावकर यांनी गंथ परिचय करून दिला.

आजही चालणार सोहळा

लिंगराज कॉलेज मैदानावर सुरू असणारा 52 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा रविवार दि. 13 पर्यंत चालणार आहे. शनिवारी झालेल्या  सोहळय़ास बेळगावसह चंदगड, खानापूर, चिकोडी, निपाणी, गडहिंग्लज आदींसह विविध भागातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.