|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रशीद फरारी….तरीही त्याच्या नावाची धास्ती कायम

रशीद फरारी….तरीही त्याच्या नावाची धास्ती कायम 

भितीपोटी रक्कम परत घेण्यास बिल्डरची टाळाटाळ

प्रतिनिधी/ बेळगाव

कुख्यात गुंड छोटाशकीलचा हस्तक रशीद मलबारी हा गेल्या दीड वर्षांपासून फरार झाला आहे. खंडणीसाठी अपहरण करुन तरुणाचा खून व बिल्डचे अपहरण या दोन प्रकरणात बेळगाव पोलिसांना हवा असलेला रशीद फरारी असला तरी त्याची नावाची धास्ती मात्र अद्याप कायम आहे.

एका बिल्डरच्या अपहरण प्रकरणात रशीदच्या साथीदारांकडून जप्त केलेली रक्कम न्यायालयातून ताब्यात घेण्यास संबंधित बिल्डरने टाळाटाळ केली आहे. कारण रशीद व त्याच्या साथीदारांची आजही त्या बिल्डरला धास्ती वाटते. म्हणुन त्याने रक्कम घेण्यास उत्सुकता दाखविली नसल्याचे दिसून येते.

13 एप्रिल 2017 रोजी हनुमाननगर येथील शरीफ यरगट्टी (वय 50) या बिल्डरचे अपहरण करण्यात आले होते. स्वतः रशीद त्यावेळी हजर होता. मालमत्ता खरेदी करायची आहे, असे सांगून शरीफ यांना बोलावून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर इनोव्हात शरीफ यांना कांबून त्यांच्या डोक्मयाला पिस्तुल रोखून मोठी रक्कम मागण्यात आली होती.

व्यावसायिक कारणामुळे इतकी मोठी रक्कम आपण देवू शकत नाही, असे संबंधित बिल्डरने सांगताच साडेतीन लाख रुपये देवून त्या बिल्डरची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर 14 मे 2017 रोजी मुजफर शेख (वय 24, रा. काकतीवेस), इम्तियाज दलायत (वय 36, रा. अशोकनगर), जतीन अर्जुन कदम (वय 31, रा. जगलबेट) यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती.

सीसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणांचा छडा लावला होता. एपीएमसी पोलीस स्थानकात बिल्डरच्या अपहरण प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. रशीदने उकळलेल्या साडेतीन लाख रुपयांपैकी 45 हजार रुपये जप्त करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.

खरे तर ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी बिल्डरने धडपड करायला हवी होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन ही रक्कम ताब्यात घेता येते. मात्र रशीद मलबारी व त्याच्या साथीदारांची धास्ती अद्याप कायम असल्यामुळे संबंधित बिल्डरने रक्कम ताब्यात घेण्यासंबंधी हालचाली केल्या नसल्याचे समजते.  

रशीद देशाबाहेर

बेळगाव येथून पलायन केल्यानंतर बांगलादेश मार्गे रशीद अरब राष्ट्रात पोहोचला आहे. त्याला अटक करण्यासाठी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या टीमने सर्वत्र जाळे टाकले होते. मात्र तो बेळगाव पोलिसांना सापडला नाही. 28 जून 2018 रोजी अबुधाबीत रशीदला अटक झाली होती. तेथील पोलिसांनी या संबंधी केंद्रिय गृह खात्याला माहिती दिली होती. कर्नाटक पोलिसांनाही त्याची कल्पना होती. रशीदचे फिंगरप्रिंट, रक्ताचे नमुने आदी देवून अबुधाबीत जाळयात अडकलेला रशीदच आहे, याची खातरजमा करुन त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र हे सर्व साहित्य मंगळूर पोलिसांकडे होते. मंगळूर पोलिसांनी हालचाली गतीमान केल्या नाहीत म्हणून 30 जुलै 2018 रोजी अबुधाबीत रशीदला जामीन मिळाली. त्यानंतर तो पुन्हा फरारी झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून रशीद फरारी असला तरी त्याची व त्याच्या टोळीची अद्याप बेळगावात धास्ती कायम आहे. मुंबई अंडरवर्ल्डच्या हालचाली सुरु आहेत, हे अनेक प्रकरणांवरुन अधोरेखीत झाले आहे.