|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गांजाच्या नशेत वाहने पेटविणाऱया जोडगोळीला अटक

गांजाच्या नशेत वाहने पेटविणाऱया जोडगोळीला अटक 

मोटार सायकल चोरीचीही दिली कबुली, सात दुचाकी जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

गांजाच्या नशेत घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने पेटविण्याबरोबरच दुचाकी चोरणाऱया एका जोडगोळीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून चोरीच्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

अनिस सलीमसाब मिरजाभाई (वय 27, रा. न्युगांधीनगर), हताश अब्दुलसत्तार हवालदार (वय 19, रा. उज्वलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांचे काही साथीदार अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत बी. के. मीटगार, ए. एम. मुजावर, अशीर जमादार, व्ही. बी. माळगी, एम. एस. चावडी, एम. जे. उज्जीनकोप्प, एन. व्हाय. मैलाके, एन. आर. अंची आदींनी भाग घेतला होता.

एक महिन्यांपूर्वी कामत गल्ली, कसई गल्ली, जालगार गल्ली परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली ऑटोरिक्षा व मोटार सायकली पेटविण्याच्या घटना घडल्या होत्या. गांजाच्या नशेत अनिस व हताश यांनी आपल्या सहकाऱयांसह हे कृत्य केल्याची कबुली दिली असून गांजासाठी मोटार सायकली चोरल्याचेही त्यांनी कबुल केले आहे.

पोलिसांनी या जोडगोळीजवळील चोरीच्या सात मोटार सायकली, रॉकेलचा डबा जप्त केला आहे. रात्रीच्यावेळी गांजा सेवन करुनच ते वेगवेगळय़ा गल्यांतून फिरत होते. फिरता फिरता घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने पेटवून ते तेथून पलायन करीत होते. गांजा खरेदी करण्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी ही टोळी दुचाकी चोरत होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.