|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवरायांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा

शिवरायांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा 

उत्साहात पार पडला लोकार्पण सोहळा

बेळगाव

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचा एक आदर्श राजा म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे हे एक सर्वसमावेशक राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचा पाडाव करून इतिहास घडविला. त्यामुळे त्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. सबंध देशात अनेक राजे होवून गेले. त्या राजांना त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने ओळखले जाते. मात्र देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ म्हणून ओळखले जाते, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले.

  शनिवारी कडोली येथील अश्वारुढ शिवपुतळय़ाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पूज्य श्री गुरुबसवलिंग स्वामी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, खासदार प्रकाश हुक्केरी, वनमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार अनिल लाड, आमदार श्रीमंत पाटील, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, चंदगडच्या आमदार संध्याताई कुपेकर, आमदार महांतेश कौजलगी, आमदार महेश कुमटळी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नवलकट्टी, माजी आमदार काकासाहेब पाटील, आमदार अजंलीताई निंबाळकर, वीरकुमार पाटील, खादी ग्रामोद्योग माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महापौर बसवराज चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील, एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष अणू कटांबळे स्वामी विवेकानंद शिक्षक संस्था अध्यक्ष अभय साळुंखे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्राम पं अध्यक्ष राजू मायाण्णा यांनी प्रास्ताविक केले. 

   प्रारंभी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जय घोषात, ढोल ताशांच्या गजरात व हजारो शिवप्रेमी या सोहळय़ात सहभागी झाले होते. यावेळी कलश घेऊन मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या सुवासिनींनी पूजन केले.

 सर्वसामान्यांसाठी झटणारा राजा

यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी आपल्या प्रजेवर जीवापाड प्रेम केले. त्यांनी कोणताच  धर्म, पंथ न मानता हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळेच त्यांचे साहस आणि धैर्य, युद्धकौशल्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मोजक्मया मावळय़ांना घेवून स्वराज्याची स्थापना केली. या शिवाजी महाराजांबद्दल आदराची भावना असलीच पाहिजे. रयतेचा राजा म्हणूनही शिवाजी महाराजांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. सर्वसामान्यांसाठी झटणारा राजा म्हणून शिवाजी महाराज सर्वांना आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

  शिवाजी महाराजांनी शस्त्रूविरुद्ध लढा देताना महाराष्ट्रातल्या डोंगर दऱयाचा अनुकुल वापर करीत गनिमीकावा पद्धत वापरुन त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुख्यता दिल्लीचे मुघल साम्राज्य यांच्याशी लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपले वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून मिळालेल्या 2 हजाराच्या छोटय़ा तुकडीवर सुरुवात करत पुढे त्यांनी मराठा साम्राज्यात 1 लाख सैनिकांचे लष्कर उभे केले असल्याचे मत पुणे येथील व्याख्याते यशवंत गोसावी यांनी काढले.

  चौकट   सर्वोदय गावात शिवसृष्टी अवतरली

     इतिहास काळापासून कडोली गावात सर्वोदयी विचारसरणीची सांगड असून अशा सर्व गोष्टींनी समृद्ध असलेल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला आणि गावच्या इतिहासात आणखी एक मोठी भर पडली आहे. सर्वोदय कार्यकर्ते आणि माजी आमदार सदाशिवराव भोसले व सहकारी मंडळींनी गावच्या इतिहासात दारू बंदी, भूदान चळवळ आदी उपक्रम राबवून गावाला चांगली संस्कृती आणि वैभव मिळवून दिले. अशा वैभवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ामुळे मोठी भर पडली आहे.