|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कडोलीत आज साहित्याचा जागर

कडोलीत आज साहित्याचा जागर 

वार्ताहर / कडोली

34 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 13 जानेवारी रोजी कडोलीत पार पडत असून साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी गाव सज्ज झाले आहे.

आमराईच्या निसर्गरम्य वातावरणात श्री शिवाजी हायस्कूल पटांगणात पॉलिफ्लो पॉलिहैड्रॉन पुरस्कृत स्वामी विवेकानंदनगरीत भव्य शामियानाची उभारणी करण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजता श्रीराम को-ऑप. क्रेडिट सोसायटीजवळ ह.भ.प. लक्ष्मण मारुती बुवा यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे. ग्रंथदिंडीत सर्व साहित्यिक, रसिक आणि विविध प्रकारची सांस्कृतिक पथके सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. याप्रसंगी ग्रंथदालनाचे उद्घाटन हंदिगनूर ग्रा. पं. उपाध्यक्ष भैरवनाथ महादेव पाटील, कै. नागुबाई आप्पाण्णा पाटील, स्मृती संमेलन मंडपाचे उद्घाटन एम. पी. फॅब्रिकेटर्स गौंडवाडचे उद्योगपती टोपाण्णा पाटील, संमेलनाचे उद्घाटन ऑटोनगर बेळगाव येथील जैन इंजिनिअरिंगचे उद्योजक अशोक दानवडे, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटक सांगाती पतसंस्था शिनोळीचे चेअरमन शरद शिवाजी पाटील, शिवप्रतिमा पूजन तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष बी. डी. मोहनगेकर, सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन श्री साई सन्मित्र सोसायटीच्या संचालिका प्रमिला विश्वनाथ पाटील, सरस्वती प्रतिमापूजन शिक्षण समिती शैक्षणिक संस्था नेसरीच्या संचालिका डॉ. अर्चना हेमंत कोलेकर, संत ज्ञानेश्वर प्रतिमापूजन इंजिनिअर श्रीनिवास कलाप्पा कालकुंद्रीकर, महात्मा जोतिबा फुले प्रतिमापूजन म. ए. समिती युवा आघाडीचे माजी अध्यक्ष ऍड. शाम पाटील आणि कै. प्रा. तुकाराम पाटील प्रतिमापूजन कडोली ग्राम पंचायत अध्यक्ष राजू मायाण्णा यांच्या हस्ते होऊन उद्घाटन कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे.

त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. या सत्रासाठी मराठा बँक बसवाण गल्ली, बेळगाव हे प्रायोजक आहेत. दुपारी 1 ते 2 वा. दुसऱया सत्रात संतांचा सामाजिक संदेश या विषयावर प्रा. बालाजी गाढेपाटील (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे. या सत्रासाठी श्री कलमेश्वर को-ऑप. सोसायटी लि. कंग्राळी बुद्रुक आणि श्रीराम को-ऑप. पेडिट सोसायटी लि. कडोली यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

दुपारी 2 वा. कै. कलूणी (काका) होनगेकर यांच्या स्मरणार्थ संभाजी होनगेकर यांच्यावतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वनभोजन झाल्यानंतर दुपारी 2.45 ते 4 वा. तिसऱया सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून यामध्ये कवी सतीश राऊत (मुंबई), प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (हलकर्णी), शरदराव सावंत (मुंबई), बसवंत शहापूरकर (कडोली), शिवाजी शिंदे (कुद्रेमनी), सु. ना. गावडे (बेळगाव) आणि संजय गोपाळ साबळे (चंदगड) आदी कवी सहभागी होणार आहेत. या सत्रासाठी श्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी काकती आणि लक्ष्मण केसरकर संचालक येवले चहा बेळगाव यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

चौथ्या सत्रात संध्याकाळी 4 ते 5 वाजता हिंमत पाटील (नागठाणे-सांगली) यांचे कथाकथन होणार आहे. या सत्रासाठी तुकाराम को-ऑप. बँक लि. शहापूरकर बेळगाव आणि नवहिंद को-ऑप. सोसायटी येळ्ळूर बेळगाव यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

उद्घाटक अशोक दानवडे

एका सामान्य कुटुंबातून त्यांनी उद्योगपतीपर्यंत झेप घेतली आहे. त्यांचा जन्म चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथील असून शिक्षणानंतर त्यांनी पुणे येथे कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1994 मध्ये घर विकून बेळगावमध्ये उद्योग सुरू केला. ते बेळगावातील आघाडीचे उद्योजक म्हणून सध्या त्यांची ख्याती आहे.