|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगेचे निधन

गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगेचे निधन 

प्रतिनिधी/ मडगाव

आपल्या तडफदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44) याला काल रविवारी दुपारी मडगावच्या एमएमसी मैदानावर फलंदाजी करत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला व तो मैदानात कोसळा. त्याच्यावर मैदानावरच प्राथमिक उपचार करून ईएसआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती नाजूक बनल्याने मडगावच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या अकाली निधनामुळे गोव्यातील क्रिकेट वर्तुळाला धक्काच बसला.

राजेश घोडगे शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. 2000 साली त्याची गोव्याच्या रणजी संघात निवड झाली होती. दोन सामन्यात त्याने गोव्याचे प्रतिनिधीत्व करताना 76 धावा केल्या होत्या. दक्षिण विभागात गोव्याचे प्रतिनिधीत्व करताना 8 एक दिवशीय सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली होती. प्रथम श्रेणीतील अंतिम सामना त्याने केरळ विरूद्ध खेळला होता. स्वप्नील अस्नोडकर सोबत राजेश सलामीला मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या टीनू योहानंन बाद केले होते.

शेवटचे खणखणीत तीन चौकार

काल रविवारी मडगावच्या एमएमसी मैदानावर, एमएमसी क्लबने आयोजित केलेल्या  एमएमसी फ्रेण्डली लिग स्पर्धेत तो ‘चॅलेंजर्स’ संघाकडून ‘ड्रग्न’च्या विरूद्ध खेळत होता. गौतम वेर्लेकर सोबत सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या राजेशने मैदानात कोसळण्यापूर्वी 31 धावाची खेळी केली होती. त्यात संतोष लोटलीकरच्या एकाच षटकात त्याने तीन खणखणीत चौकार ठोकले होते. ज्यावेळी तो मैदानात कोसळला त्यावेळी तो ‘नॉन स्ट्राकिंग एण्ड’ला होता. ही घटना संध्याकाळी 3.10च्या दरम्यान घडली. 

मैदानावरच उपचार पण…

ड्रग्न व चॅलेंजर्स याच्यातील सामन्यात डॉ. प्रसाद घोडे, डॉ. सत्येन कामत व डॉ. सर्वेश कामत हे तीन डॉक्टरसुद्धा खेळत होते. राजेश मैदानात कोसळताच, त्याच्यावर या तिन्ही डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्याची बंद पडलेली हृदयप्रक्रिया त्यांनी पंपिंग करून पुन्हा सुरू करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. नंतर त्याला त्वरित जवळच्याच ईएसआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून मडगावच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शनिवारी तडफदार 62 धावांची खेळी

यंदा जीसीएच्या ‘ए’ विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत राजेश कुडचडे येथील डॉ. कुडचडकर यांच्या संघातून खेळत होता. शनिवारी सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानावरील सामन्यात तडफदार 62 धावांची खेळी केली होती.

राजेश याच्या पश्चात पत्नी : डॉ. राखी घोडगे प्रभुदेसाई (गोमेकॉच्या स्कीन स्पेशालिस्ट) तसेच कन्या : सीया (लॉयोला हायर सेंकडरीची बारावीची विद्यार्थीनी) असा परिवार आहे. आज सोमवारी दुपारी 12 वाजता मडगाव हिंदु स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

क्रिकेट वर्तुळाला जबरदस्त धक्का

राजेश घोडगे यांच्या निधनाने मडगाव क्रिकेट क्लबच्या खेळाडूना तसेच सदस्यांना जबरदस्त धक्का बसला. अनेकांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

खेळाडूबरोबरच उत्कृष्ट आयोजक होता : लोटलीकर

गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुरज लोटलीकर यांनी राजेशच्या निधनावर दुःख व्यक्त करताना, मैदानावरील खेळाडूपेक्षा राजेश हा उत्कृष्ठपैकी आयोजक होता, अनेक स्पर्धा यशस्वी करण्यास त्याने मोलाचे योगदान दिल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. राजेश या वयातसुद्धा स्पर्धात्मक क्रिकेट सामने खेळत होता हे विशेष. तो इतरासाठी आदर्श असल्याचे श्री. लोटलीकर म्हणाले.

जीसीए, क्रिकेटचे नुकसान

मडगाव

केवळ गोव्याच्या क्रिकेट व गोवा क्रिकेटलाच नव्हे तर व्यक्तिशा माझ्यासाठी राजू घोडगेच्या जाण्याने प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव दया पागी यांनी दिली आहे. गोव्याच्या क्रिकेटसाठी व प्रामुख्याने जीसीए क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात त्याने दिलेले सहकार्य न विसरण्यासारखे आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर तसेच जीसीएच्या व्यवस्थापकीय मंडळातील  सदस्यांनीही घोडगे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मडगाव क्रिकेट क्लबचे संयुक्त सचिव असलेल्या राजूने एमसीसीवर यंदा झालेल्या बीसीसीआयच्या 16 व 19 वर्षांखालील सामन्यांच्या आयोजनावेळी दिलेले सहकार्य मोलाचे होते. आम्हाला या सामन्यांच्या आयोजनावेळी त्याने कोणतीही उणीव जाणवू दिली नाही. राजू घोडगे म्हणजे एक क्रिकेटमधील आगळं वेगळं रसायनच होते असे दया पागी म्हणाले.

युवा क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही न विसरण्यासारखे. गोव्यात येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठीही त्याचा सहभाग होता. त्याने काढलेल्या या स्पर्धेच्या वेळापत्रकाला तर बीसीसीआयने लागलीच मान्यताही दिली होती.  मैदानी क्रिकेटवरच जास्त लक्ष केंद्रीत करणारा आपला सहकारी आता आपल्यात नाही, असे अजुनही आपणास विश्वास बसत नसल्याचे दया पागी यावेळी खेदाने म्हणाले.

कधीही भरून न येणारी हानी : पेडणेकर

गोव्याच्या क्रिकेटची न भरून येणारी हानी झाल्याचे यावेळी गोव्याची माजी रणजीपटू आणि रणजी संघ निवड समितीचे चेअरमन शरद पेडणेकर यावेळी म्हणाले. रणजी संघ निवड समितीच्या बैठकीत घोडगे प्रभावीपणे आपली बाजू मांडत. उच्च दर्जाची क्रिकेट जरी घोडगे कमी खेळले असले तर सामन्यांच्या आयोजनात त्याचा अनुभव दांडगा होता, असे पेडणेकर म्हणाले.

आक्रमक फलंदाजी करणारा क्रिकेटपटू : काकोडे

माझ्या कप्तानपदाखाली राजू घोडगेने गोव्यासाठी रणजी सामन्यात प्रतिनिधीत्व केले. तो एक उत्कृष्ट व आक्रमक फलंदाजी करणारा क्रिकेटपटू होता. या वयातही स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारा तो आमच्यातील एकमेव क्रिकेटपटू होता, असे गोव्याचे माजी रणजी कप्तान व प्रशिक्षक प्रशांत काकोडे म्हणाले.

क्रिकेट प्रशिक्षक विनोद धामस्कर, संदीप नाईक, माजी क्रिकेटपटू विनय पालेकर तसेच विविध क्लबांच्या प्रतिनिधीनी राजू घोडगे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.