|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संतांचा सामाजिक संदेश संभ्रमाच्या वातावरणात मार्गदर्शक

संतांचा सामाजिक संदेश संभ्रमाच्या वातावरणात मार्गदर्शक 

बेळगाव :

 संतांनी जात हा घटक जाणीवपूर्वक दूर ठेवत समाज सुधारणेला प्राधान्य दिले. समता हे त्यांच्या विचारांचे आणि सुधारणांचे मूल्य होते. संतांनी देव नाकारला नाही पण त्यांनी तो माणसांमध्ये पाहिला. आज संभ्रमाच्या वातावरणात संतांचा सामाजिक संदेशच मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत बालाजी गाढे-पाटील यांनी व्यक्त केले.

साहित्य संमेलनात ‘संतांचा सामाजिक संदेश’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संतांनी 12 व्या शतकात समाज सुधारणेची चर्चा केली. तेव्हा राष्ट्र आणि राज्य ही संकल्पनाही नव्हती. संतांचा धर्म हा भेदाभेद अमंगळ मानून समतेचा पुरस्कार करणारा होता. समाजात 6742 जाती व पोटजाती आहेत. जात बाजुला ठेवून संतांनी समता आणि प्रबोधनाचा धर्म महत्त्वाचा मानला. साधकांना सेवक व सेवकांना प्रबोधक बनविणारा हा धर्म होता.

अज्ञान दूर व्हावे म्हणून प्रबोधन करणारे नामदेव पंजाबात गेले. शीख धर्मग्रंथात त्यांचे 60 अभंग आहेत. पाकिस्तानात जाऊन कट्टरतावाद नाकारण्याचे धाडस त्यांनी दाखविले. बसवेश्वरांनी खालच्या जातीतील मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावून देऊन माणसापेक्षा जात महत्त्वाची नाही हे दाखवून दिले. चक्रधरस्वामींनी 12 व्या शतकात महिलांचा विटाळ अशुद्ध नाही हे ठासून सांगितले. जनाबाईने ‘स्त्राr जन्म म्हणूनी न क्हावे उदास’ असा नारा दिला. नामदेवांनी भागवताची पताका उभी केली.

संतांनी दांभिकता, जात नाकारली. आज व्रतवैकल्याच्या नावाखाली नवे वेडेपण आले आहे. आजचे संत श्रीमंतीचे पक्षपाती प्रदर्शन करत राहतात. लोकांचे कळप तयार करतात. मात्र, पूर्वीच्या काळातील संत स्वतः लोकांपर्यंत जात. धर्माने महिलेला माणूस म्हणून जगण्यास नाकारले तेव्हा तो धर्म आमचा नाही हे सांगण्यात संत मागे राहिले नाहीत, असेही ते म्हणाले. वेदाआधी व वेदातल्या आधी तू होतास हे माणसा आपण देवाला जन्म दिला हे बाबुल सांगतात. दुर्दैवाने आपण आपल्या बुद्धीची उंची आणि लांबी वाढविली नाही. त्यामुळे हे वास्तव आपल्याला समजत नाही, अशीही टिप्पणी बालाजी यांनी केली. माणसाला भयभीत आणि लाचार करतो तो धर्म नव्हे, असे त्यांनी नमूद केले.