|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » एच आर प्रमुखानेच कंपनीला घातला 92 लाखांचा गंडा

एच आर प्रमुखानेच कंपनीला घातला 92 लाखांचा गंडा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एका वस्त्रोद्योग कंपनीच्या एच. आर प्रमुखानेच कंपनीला तब्बल 92 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नितीन बोराडेला(55) अटक करण्यात आली आहे. बोराडे हा घोटाळा 2011-2018 अशी सात वर्षं करत होता.

 

संबंधित कंपनीत नितीन बोराडे 27 वर्षांपासून कार्यरत आहे. 2011मध्ये कंपनी सोडून गेलेल्या दोन कर्मचाऱयांची पगाराची खाती बंद करण्याऐवजी बोराडेने सुरूच ठेवली. ते दोघंही कंपनीचे कर्मचारी असल्याचे दाखवत बँकेला त्यांचा पगार देण्यास सांगितले. त्यांचा पगार झाला की तीच रक्कम बोराडे दोन समाजसेवी संस्थाच्या नावाने असलेल्या खोट्या खात्यांमध्ये वळवायचा. नंतर चेकनी त्या खात्यातून ती रक्कम काढून घ्यायचा. हा प्रकार बोराडे सात वर्षं करत होता. 67 चेक देऊन त्याने तब्बल 92 लाख रुपये इतकी रक्कम घशात घातली.

 

2018नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱयांना पगारवाटपामध्ये काहीतरी गफलत असल्याचे लक्षात आले. कंपनी सोडून गेलेल्या दोन कर्मचाऱयांना पगार कसा काय होतो? हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा तपास केला असता हा घोटाळा उघडकीस आला. नितीन बोराडेला पैसे काढताना रंगे हात पकडण्यात आले. पोलिसांनी बोराडेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित माजी कर्मचाऱयांनी या प्रकाराची आम्हाला काहीच माहिती नाही असे सांगितले आहे तर, या घोटाळय़ात ते दोन कर्मचारीही सहभागी आहेत असा आरोप बोराडेने केला आहे.