|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » ट्रकच्या धडकेने बुलेटस्वारांचा मृत्यू ; एकाच वेळी तीघांची अंत्ययात्रा

ट्रकच्या धडकेने बुलेटस्वारांचा मृत्यू ; एकाच वेळी तीघांची अंत्ययात्रा 

ऑनलाईन टीम / भुसावळ :

मित्राच्या बुलेट गाडीची चक्कर मारण्याची हौस भुसावळातील तीन मित्रांच्या जिवावर बेतली. अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा अंत झाला. महामार्गावरील माळी भवनजवळ शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. तिन्ही मित्रांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी 2 वाजता एकाच वेळी काढण्यात आली. तिघांवर एकाच वेळी दफनविधी करण्यात आला.

शहरातील शेख वाजिद शेख रफिक (23), शेख समीर शेख हमीद (22) व शेख जावीद शेख मोहिनोद्दीन (22) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री त्यांनी मित्र मेमन याची बुलेट (एमएच 19 डीई 9146) चक्कर मारण्यासाठी घेतली. महामार्गावर माळी भवनाकडे तिघे बुलेटवर चक्कर मारण्यासाठी गेले होते. त्याच वेळी वरणगावकडून जळगावकडे जाणाऱया अज्ञात ट्रकने बुलेटला धडक दिली. तिघांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला. पोलिसांनी नाहाटा चौफुली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, संबंधित वाहन आढळले नाही. याप्रकरणी शेख जाकीर हुसेन शेख अफजलोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अपघातातील बुलेट ताब्यात घेतली. पोलिस निरीक्षक देवीदास पवार तपास करत आहेत.