|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी ठार

भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी ठार 

महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे ट्रकची दुचाकीला धडक : मृत कोलगाव येथील

वार्ताहर / कुडाळ:

 मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे ट्रक व प्लेझर दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तथा रेल्वे कर्मचारी लक्ष्मीकांत गणपत नाईक (49, रा. कोलगाव-कुंभयाळवाडी) जागीच ठार झाले. ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडक दिल्यानंतर स्वारासह दुचाकी ट्रकबरोबर फरफटत सखल भागात गेली. ट्रकही उलटला. यात दुचाकी ट्रकच्या पुढच्या चाकाला अडकलेल्या स्थितीत होती, तर दुचाकीस्वार ट्रकच्या केबिनखाली चिरडला होता. हे दृश्य विदारक व अंगावर शहारे आणणारे होते. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. ट्रक चालकाला तेथील ग्रामस्थांनी ‘प्रसाद’ दिला.

 दरम्यान, ट्रकचालक शिवाजी नागप्पा लोहार (42, रा. कोल्हापूर) पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अपघाताची खबर नाईक यांचे बंधू राजेश गणपत नाईक यांनी पोलिसांत दिली.

घरी जाताना घडली घटना

 लक्ष्मीकांत नाईक कोकण रेल्वेत रेल मेन्टेनन्स व्हॅनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. कुडाळ येथून वर्षभरापूर्वी त्यांची राजापूर येथे बदली झाली होती. आज त्यांची सुट्टी असल्याने ते सकाळी कोलगावहून कुडाळ येथे डॉ. जी. टी. राणे यांच्याकडे तपासणीसाठी आले होते. तेथून ते दुपारी आपल्या ताब्यातील दुचाकी प्लेझरने घरी जायला निघाले.

ट्रकने दुचाकीला फरफटत नेले

 मालवाहू रेल्वेतून झाराप रेल्वेस्थानक येथे जिल्हय़ाचे धान्य येते. तेथून ट्रकने ते धान्य एमआयडीसी गोदामात साठवण केले जाते. त्यातील एक ट्रक धान्य घेऊन कुडाळच्या दिशेने येत होता. महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी (वासुदेव कुडतरकर यांच्या दुकानासमोर) येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. तेथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन आपल्या मार्गाने जाणाऱया नाईक यांच्या दुचाकीला धडक देत सखल भागात गेला आणि उलटला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सुदैवाने दोन दुचाकीस्वार बचावले

 अपघातग्रस्त ट्रक दुसऱया धान्य घेऊन जाणाऱया ट्रकला ओव्हरटेक करीत होता. तेव्हा रस्त्यावरील उंच-सखलपणामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. एका मोटारसायकलस्वाराने त्या चालकाला सावधानतेचा इशारा केला. पण एवढय़ात नाईक यांच्या दुचाकीला धडक देत तो ट्रक उलटला. यात अपघातग्रस्त दुचाकीच्या मागे व पुढे असलेले दोन मोटारसायकलस्वार सुदैवाने बचावले. अपघाताचे वृत्त समजताच बिबवणेचे माजी सरपंच दादा चव्हाण यांनी घटनास्थळी जात पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. ट्रक चालकाला तेथील काहींनी चांगला ‘प्रसाद’ दिला.

ट्रकचालक पोलीस ठाण्यात हजर

 नंतर ट्रक चालक तेथून सटकला आणि कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ट्रकच्या केबिनखाली होता. प्रथम क्रेन उपलब्ध झाली नाही. नंतर दिलीप बिल्डकॉनच्या दोन क्रेन आणून दीड तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमानचे आनंद शिरवलकर, रुपेश बिडये तसेच राजू तेंडोलकर, दादा चव्हाण, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, समीर पाटकर, उमेश सामंत, ताता मेस्त्राr यांनी सहकार्य केले. घटना समजताच कोलगाव-कुंभयाळवाडी ग्रामस्थ तसेच रेल्वे कर्मचाऱयांनी धाव घेतली. लक्ष्मीकांत नाईक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते रेल्वे कर्मचाऱयांमध्ये ‘एल. जी. नाईक’ म्हणून परिचित होते.

..अन्यथा धान्य वाहतूक करू देणार नाही!

 मालगाडीतून धान्य आले की, ते एमआयडीसी येथील गोदामात आणले जाते. या वाहतुकीचा ठेका दिला जातो. वाहतूक करताना जास्त फेऱया कशा होतील, यासाठी ट्रक चालकांमध्ये स्पर्धा असते. ही घटना त्यामुळेच घडली. याबाबत माजी उपसभापती बबन बोभाटे यांनी संबंधित ठेकेदाराची भेट घेऊन त्याला सुनावले. झाराप तिठा येथे ट्रक पास करण्यासाठी एक कामगार नेमण्याची सूचना केली. सुसाट वेगात ट्रक दिसता नयेत. तशा सूचना ट्रकचालकांना द्याव्यात. नाही तर येथून धान्य वाहतूक करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

वाहतूक ठेकेदारावर कारवाई करावी!

 धान्याच्या जादा फेऱया मारण्यासाठी या ट्रक चालकांमध्ये चढाओढ असते. त्यांना कुणाच्या जीवाची पर्वा नसते. ते पैशांच्या हव्यासापोटी कुणाला जुमानत नाहीत. हा कर्मचारी त्यांच्या बेदरकारपणाचा बळी ठरला आहे. आंदोलन करण्याची वेळ येण्यापेक्षा संबंधित यंत्रणा अशी वाहतूक दिसते. त्यावर कारवाई का करीत नाही?, असा सवाल केआरसी एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी करून जिल्हाधिकारी यांनी संबंधित वाहतूक ठेकेदारावर कारवाई करावी. यापुढे या वाहतुकीमुळे कुणाचीही जीवितहानी झाली, तर संबंधित ठेकेदाराचा धान्याचा एकही ट्रक जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.