|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सामान्यांची कळकळ बाळगणारी महिला

सामान्यांची कळकळ बाळगणारी महिला 

आघाडीच्या विदेशी बँकांचं भारतात सलग तीन दशकं नेतृत्व करणाऱया आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या असलेल्या मीरा संन्याल यांचं अलीकडेच अकाली निधन झालं. यामुळे सार्वत्रिक हळहळ व्यक्त केली जाणं हे स्वाभाविकच आहे. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, म्हणजेच आरबीएस या भारतातील विदेशी बँकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊन, त्या 2009 साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून, तर 2014 साली ‘आप’च्या उमेदवार म्हणून निवडणुकीत अपयशी ठरल्या होत्या. लठ्ठ पगाराची नोकरी सोडून देऊन सार्वजनिक जीवनात प्रवेश करणं, हे वाटतं तेवढं सोपं नसतं. मीराताईंना मी जे पाहिलं आहे, त्यावरून त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा अदमास येत होता. झोपडपट्टीवासीय, चाळकरी, पदपथवासीय यांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी त्या हिरिरीने भाग घेत असत. निवडणुकीत हरल्यानंतर, शहरातील नागरी समस्यांमध्ये लक्षच घालायचं नाही, अशी त्यांची वृत्ती नव्हती. व्यापारी व उद्योजकांचे प्रश्नही लक्षात घेऊन, त्यांची सोडवणूक करण्यासाठी धडपडणं, हा मीराताईंचा स्वभाव होता. त्यांना दोन वर्षं कर्करोगाशी झुंजावं लागावं आणि त्यात मृत्यू यावा, यामुळे सामान्यांच्या मनाला नक्कीच क्लेश होत असणार.

भारतातील बँकिंग क्षेत्र हे महिला सक्षमीकरणाचं एक ठळक उदाहरण म्हणावं लागेल. स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आलेल्या चंदा कोचर या व्हिडिओकॉन प्रकरणात वादात सापडल्या आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. तरी बँकिंग क्षेत्रातली त्यांची कामगिरी उपेक्षणीय नाही. शिखा शर्मा यांनी ऍक्सिस बँकेच्या शाखांचा आणि मालमत्तांचा विस्तार केला. उषा अनंत सुब्रमण्यम या अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी. इंडियन बँक्स असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवणारी ती पहिली महिला. तसंच भारतीय महिला बँकेच्याही त्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. नैना लाल किडवाई यांनी एचएसबीसीचं भारतात नेतृत्व केलंच, पण फिकीसारख्या औद्योगिक संघटनेलाही दिशा दिली. अर्चना भार्गव यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून युनायटेड बँक ऑफ इंडियाला वळणावर आणलं. कल्पना मोरपारिया या जे पी मॉर्गन इंडियाच्या मुख्याधिकारी. बँकेच्या धोरणात्मक गटाच्या सदस्य म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काकु नखाते तर बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच इंडियाच्या कंट्री हेड.

या पार्श्वभूमीवर मीराताईंची कामगिरीही नोंद घेण्यासारखीच म्हणावी लागेल. नौदल प्रमुख दिवंगत गुलाब हिरानंदानी हे त्यांचे पिता. भारतीय नौदलाने कराचीवर जो हल्ला घडवला होता, त्या ऑपरेशन ट्रायडंटची आखणी त्यांनीच केली होती. ही गोष्ट भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971च्या युद्धाची. तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. इंदिराजींच्या कणखर नेतृत्वाचा खोल परिणाम मीराताईंवर झाला. मीराताईंनी मुंबईत सिडनेहॅम कॉलेजातून पदवी घेतली. आणि त्यानंतर फ्रान्समधून त्या एमबीए झाल्या. जगद्विख्यात हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. ब्रिटनच्या चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ बँकर्सच्या त्या फेलो आहेत. मीराताईंचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, आरबीएसमध्ये असताना, त्यांनी राबवलेल्या मायक्रो फायनान्स प्रोग्रॅमचं. या कार्यक्रमातून ग्रामीण भारतातील साडेसहा लाख स्त्रियांना त्यांच्या धंदा-व्यवसाय वगैरेंसाठी अर्थसाह्य करण्यात आलं. बँकेच्या प्रति÷ानतर्फे 75 हजार स्त्रियांना निर्वाहासाठी साह्य पुरवण्यात आलं. मीराताई आरबीएसच्या कॉर्पोरेट फायनान्स विभागाच्याही प्रमुख होत्या. तसंच एबीएन ऍम्रोच्या आशिया विभागाच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होत्या. मीराताईंनी एबीएन ऍम्रो तसंच आरबीएससाठी ग्लोबल जागतिक स्तरावरच्या बीपीओ आणि आयटी कंपन्या सुरू केल्या होत्या. राइट टू प्ले ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटना आहे. खेळाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांमधील कौशल्ये वाढवण्याचं काम ती करते. या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या सदस्य म्हणूनही मीराताईंनी उल्लेखनीय काम केलं. सुशासनासंबंधी काम करणाऱया लिबरल्स इंडियाच्या त्या सदस्य होत्या, तसंच इंडियन लिबरल ग्रुपमध्येही त्या सहभागी होत्या. सरकारबाहेर राहून, पूर्णतः खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारा हा गट असून, मीराताईंची या विचारसरणीवर मनापासून श्रद्धा होती. इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर आप या पक्षाची बाजू अत्यंत संयतपणे मांडणाऱया मीराताई बँकिंग व उद्योगाविषयीच्या चर्चांमध्ये कितीतरी नवे मुद्दे मांडत असत. फिकी, तसंच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, म्हणजेच सीआयआय या संघटनांमध्ये सक्रिय राहून मीरा संन्याल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी मीराताईंना ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑन विमेन्स बिझिनेस लीडरशिप’च्या मंडळावर भारताच्या एकमेव प्रतिनिधी म्हणून घेतलं होतं. जागतिक स्पर्धात्मकता परिषद, हवामान परिषद किंवा आशियाई स्त्री नेत्यांची परिषद असो, मीरा संन्याल यांना तिथे मानाने बोलावलं गेलं आणि त्या त्या वेळी मीराताईंनी तिथे जाऊन अभ्यासपूर्ण भाषणं केली.

बनावट नोटांचा तसंच काळय़ा पैशाचा शोध, दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करणं आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी निश्चलनीकरण करण्यात आलं. ही उद्दिष्टं सफल झाली असल्याचं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं. परंतु त्याबद्दल मीराताईंची भूमिका वेगळी होती. ‘द बिग रिव्हर्स : हाउ डिमॉनिटायझेशन नॉक्ड इंडिया आउट’ हे पुस्तक लिहून मीरा संन्याल यांनी त्यात आपले आक्षेप मोकळेपणाने नोंदवले होते. या पुस्तकासाठी मीराताईंनी बँकिंग, अर्थव्यवस्था आणि एकूणच व्यापार व उद्योगजगताचा सखोल अभ्यास केला होता, हे सदर पुस्तक वाचताना जाणवतं. दोन हजारच्या नवीन नोटा आणल्यामुळे, भ्रष्टाचारी अधिकाऱयांना लाच घेणं अधिक सोपं गेलं, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मीराताईंच्या मालकीच्या दोन कंपन्या होत्या. म्हणजे केवळ इतरांना सल्ले देऊन त्या समाधानी झाल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःही यशस्वीपणे व्यवसाय केला. ‘देशाने एक तल्लख आर्थिक मेंदू गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे, ती उगाच नव्हे. मीराताईंचं व्यक्तिमत्त्व अगदी शांत, सौम्य आणि प्रसन्न होतं. पण एखादा प्रश्न हाती घेतला, की त्यासाठी त्या चिकाटीने लढत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या क्षेत्रात जो कोळसा आयात केला जातो, त्याची हाताळणी नीट केली जात नाही. त्यामुळे परिसरात आरोग्याचे व पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकरिता त्यांनी न्यायालयात लढाई दिली. त्यांची उणीव भासतच राहील.

नंदिनी आत्मसिद्ध