|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रत्नागिरी-सिंधुदुर्गात सेना-भाजपमध्येच वर्चस्वाची लढाई

रत्नागिरी-सिंधुदुर्गात सेना-भाजपमध्येच वर्चस्वाची लढाई 

शिवसेना भाजपाची युती अस्पष्ट असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आणि उमेदवारांची चाचपणीही झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पेक्षा शिवसेना-भाजपामध्येच खरी वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

शिवसेना भाजपाची युती अद्यापही तळ्यात-मळ्यातच आहे आणि युती होण्याची शक्यताही धुसरच दिसत आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात लोकसभेचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीची फारशी चांगली स्थिती नाही. नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपासोबत जाऊ शकतो किंवा भाजपाची साथ घेऊ शकतो. त्यामुळे या लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपामध्येच खरी वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात चिपळूणपासून सावंतवाडीपर्यंत सहा विधानसभा मतदार संघ येतात. 2018 मध्ये झालेल्या लढतीत शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल दीड लाख मतांनी निवडून आले होते. आता मात्र गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलत आहेत. मागील निवडणुकीत लढणाऱया राणेंनी आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची फारशी चांगली स्थिती या मतदार संघात राहिलेली नाही. तरीपण काँग्रेस व राष्ट्रवादीकडून कुणाच्या नावाचा विचार होतो हेही पहावे लागेल. शिवसेना-भाजपाची युती अस्पष्ट झाल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार हे चित्र जवळ-जवळ स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना भाजपाचीच खरी लढत होणार आहे. मात्र राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपाला साथ देणार की भाजपाच्या साथीने आपण निवडणूक लढवणार आहेत हेही महत्त्वाचे ठरणार असून स्वाभिमानी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे पाच तर काँग्रेसकडे एक विधानसभेची जागा आहे.  लोकसभा मतदार संघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहेतच परंतु विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पूर्ण मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. शिवसेनेचे सचिवपद आणि ‘मातोश्री’ वर असलेले वजन यामुळे पूर्ण संघटनेवर त्यांचे नियंत्रण आहे. जवळपास सगळीकडे असलेले पक्षाचे संघटनात्मक बळ आणि शिवसेनेविषयी कोकणात असलेली आत्मीयता हे त्यांचे बळ आहे. पक्षांतर्गत फारसा कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास नक्की आहे. भाजपा स्वतंत्रपणे लढल्यास केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येऊ शकते. सावंतवाडी महोत्सवावेळी प्रभूनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. परंतु राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारण ही एक नशा असते आणि ती निवडणूक लढवल्यावरच तिची मजा घेता येते. मग त्यात पराभव झाला तरी.  पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपची पिछेहाट पाहता लोकसभेला भाजपासाठी एक-एक सीट महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यमान बहुसंख्य केंद्रीय मंत्र्यांना भाजप निवडणूक रिंगणात उतरवू शकतो. त्यामुळे पक्षादेश म्हणून प्रभूंना निवडणुकीत उतरावे लागेल. या मतदार संघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेला तगडे आव्हान देण्यासाठी प्रभूंचे नाव पुढे येऊ शकते. त्याशिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु आव्हानात्मक उमेदवार म्हणून प्रभूंकडेच पाहिले जाऊ शकते.

 शिवसेना-भाजप युती झाल्यास स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादीशी जवळीक साधेल असे चित्र होते. नारायण राणे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीही झाल्या. स्वाभिमान पक्षाने काढलेल्या विश्वास यात्रेमध्ये राणेंनी भाजपावर टीकाही केली होती. परंतु आता युतीची शक्यता धुसर झाल्याने भाजप-स्वाभिमान एकत्र येतील अशी स्थिती आहे. भाजपाने आपल्या जाहीरनामा व प्रचार यंत्रणा समितीमध्ये राणेंचा समावेश करून त्यांना थंड केले आहे. त्यामुळे भाजपा व स्वाभिमान पक्ष एकत्र आल्यास शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. स्वाभिमान पक्ष माजी खासदार निलेश राणेंचे नाव पुढे करून या मतदार संघावर आपला दावाही करू शकतो

राणे काँग्रेस सोडून गेल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचीही फारशी चांगली स्थिती नाही. भास्कर जाधव यांच्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात राष्ट्रवादीची थोडीफार ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव पुढे आणले जात आहे. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी झाली तर राष्ट्रवादीला हा मतदार संघ मिळणे कठीण आहे. पहिल्यापासून काँग्रेसला या मतदार संघाची जागा सोडली जाते. त्यामुळे काँग्रेसकडूनही संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली असून शिवसेना-भाजपाला कडवे आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जात असणारे डॉ. भालचंद्र मुणगेकर तसेच हुसेन दलवाई किंवा भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे नाव पुढे येऊ शकते.

एकूणच शिवसेना भाजपाची युती अस्पष्ट असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे, आणि उमेदवारांची चाचपणीही झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना-भाजपामध्येच खरी वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. हा मतदार संघ नेहमीच संवेदनशील म्हणून पाहिला जातो आणि यावेळच्या निवडणुकीतही तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास संवेदनशिल म्हणून या मतदार संघाकडे पाहिले जाऊ शकते.

संदीप गावडे