|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » श्रीकृष्ण गोपींचा आत्मा

श्रीकृष्ण गोपींचा आत्मा 

एक गोपी म्हणू लागली-लोक कांहीही म्हणोत, मला तर कृष्ण येथेच दिसत असतो. तो मथुरेला गेलाच नाही. काल संध्याकाळी पाणी भरण्यासाठी यमुनेला जावे लागले, अंधार व्हायला आला होता आणि मला भय वाटू लागले होते. एवढय़ात माझ्या डोक्मयावर घडा ठेवून आणि गोष्टी बोलत बोलत तो मला घरी पोचवून गेला. तो म्हणत होता कीं तो येथे व्रजांतच राहतो. मला त्याच्या गोष्टी वारंवार आठवतात. मी त्याचें स्वरूप विसरू शकत नाही. त्याच्याशी गोष्टी बोलल्याशिवाय मला चैनच पडत नाही. मोठमोठे साधू आणि योगीजन समाधी लावून संसार विसरायचा भगीरथ प्रयत्न करीत असतात; तरी पण त्यांना सफलता मिळत नाही. त्यांची वृत्ति प्रभुमय होत नाही. तर इकडे या गोपी प्रयत्न करूनही संसाराचे स्मरण ठेवू शकत नाहीत. एक पळ देखील कृष्णाला विसरत नाहीत. प्रभूला विसरायचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होतात. प्रत्येक वस्तूला विसरणें शक्मय आहे. पण आत्म्याला विसरता येत नाही. श्रीकृष्ण गोपींचा आत्मा आहे म्हणून त्या कृष्णाला कशा विसरू शकतील?

गोपी याप्रमाणे श्रीकृष्णाविषयीं गोष्टी करीत होत्या. एवढय़ात उद्धव स्नानादि आटोपून भगवंतांनी दिलेला पीतांबर आणि वैजयंतीमाला धारण करून आले. गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते. त्याने पीतांबर धारण केला होता. त्याच्या गळय़ात कमळांची माळ व कानांमध्ये रत्नजडित कुंडले झगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते. गोपी आपापसात म्हणू लागल्या-हा पुरुष अतिशय देखणा आहे. परंतु हा आहे कोण? कोठून आला? कोणाचा दूत आहे? याने श्रीकृष्णासारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणाऱया उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या. उद्धवांनी आपला परिचय सांगून त्यांना म्हटले-मी तुमच्या मथुरावासी श्रीकृष्णाचा अंतरंग सखा उद्धव आहे आणि तुमच्यासाठी त्यांचा संदेश घेऊन आलो आहे. त्यावर काही गोपी म्हणाल्या-तुम्ही तर नुसते नकली पंडित दिसता! श्रीकृष्ण काय नुसता मथुरेंतच राहतो का? तो तर सर्वत्र आहे. तुम्हाला फक्त मथुरेतच कृष्ण दिसतात, आणि आम्हाला तर येथील कणाकणांत त्यांचे दर्शन होत असते. तो पहा तेथे कदंबाच्या झाडावर बसलेला कृष्ण बासरी वाजवीत आहे. काय, तुम्हाला दिसत नाही तो? ऐकू येत नाही? उद्धवा! तुम्हाला जर श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला असता तर तुम्ही त्यांना सोडून येथे आलाच नसता किंवा तुम्हाला येथेही कृष्णाचें दर्शन झाले असते. उद्धव मनोमन विचार करू लागले – गोपींची अवस्था किती विलक्षण आहे!  दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी आणि कल्याणाच्या इतर सर्व साधनांद्वारे ईश्वराचा साक्षात्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सर्व साधने भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहेत.

Ad. देवदत्त परुळेकर