|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कट्टर काँग्रेसमन

कट्टर काँग्रेसमन 

ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांनी सोमवारी चौदा जानेवारीला मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि शिराळा तालुकाच नव्हे अवघा कृष्णा-वारणाकाठ गहिवरला. महाराष्ट्राच्या राजकारणात चार-पाच दशके इतकी दीर्घ आणि चांगली कामगिरी करणारे स्वच्छ नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा होती. त्याच जोडीला वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेस पक्ष यांचे विचार उंचवणारा, जपणारा नेता आणि मंत्रीमंडळात अनेक वर्षे गृह, सहकार, पाटबंधारे, कृषी, उर्जा अशी मोठी खाती सांभाळूनही जमिनीवरुन चालणारा नेता अशी त्यांची ओळख होती. साधेपणा, पक्की विचारनिष्ठा आणि निश्चित दिशा यामुळे राजकारणाच्या, समाजकारणाच्या कोलाहलात शिवाजीराव देशमुख यांचे एक स्वतंत्र स्थान होते आणि राजकारणाच्या कितीही उलटसुलट उडय़ा झाल्या. सत्तांतरे झाली. राजकीय पक्षांना उभे-आडवे छेद गेले तरी ध्रुवताऱयासारखे ते अखेरपर्यत एकनिष्ठ, एका पक्षात कायम राहिले. कट्टर काँग्रेसमन, काँग्रेसनिष्ठ ही त्यांची ओळख कायमची कोरली गेली आहे. तो काळच वेगळा होता. मंतरलेला होता. काँग्रेसचे आणि स्वातंत्र्य लढय़ाचे संस्कार घेऊन वतनदार देशमुख घराण्यातील एक सुशिक्षित युवक तासगाव पंचायत समितीत गट विस्तार अधिकारी म्हणून चांगले काम करत होता. वसंतदादा पाटील यांनी त्यांना राजकारणात आणले आणि डोंगरी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱया शिराळा तालुक्यातून बिळाशी मतदारसंघातून ते जि. प. सदस्य म्हणून विजयी झाले. 1967 साली सुरु झालेला हा प्रवेश उत्तरोत्तर वाढत गेला. 1978 मध्ये ते शिराळा विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून आमदार झाले आणि त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी कधीही राजकारणात पराभव स्वीकारला नाही. कोयनेचा भूकंप, खुजगाव-चांदोली वाद, वसंतदादा-शंकरराव चव्हाण संघर्ष आणि शरद पवार यांनी पुलोद, समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे केलेले प्रयत्न या सर्व काळात शिवाजीराव देशमुखांनी वसंतदादा पाटील व काँग्रेस पक्षाची ध्वजा उंचावण्याचा नेटका प्रयत्न केला आणि नेमस्त राजकारणी अशी भूमिका स्वीकारुन, कोणतीही कटुता येऊ न देता त्यांनी लोकहिताचे, पक्षहिताचे राजकारण केले म्हणूनच त्यांच्या ललाटी काँग्रेसनिष्ठ असा शिक्का सौभाग्यासारखा कोरला गेला आणि पक्षानेही त्यांनी संघटनेत आणि मंत्रीमंडळात मोठी व चांगली संधी दिली. यशवंतराव चव्हाणांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला पण, नव महाराष्ट्राच्या उभारणीत ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यामध्ये शिवाजीराव देशमुख यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. 1980 साली वसंतदादांच्या मंत्रीमंडळात ते गृहमंत्री झाले. वसंतदादा, शंकरराव चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, शरद पवार, विलासराव देशमुख अशा अनेकांच्या मंत्रीमंडळात त्यांनी गृह, सहकार, उर्जा, पाटबंधारे, कृषी, बांधकाम, ग्रामविकास, वाहतूक, संसदीय कामकाज, सैनिक कल्याण अशी अनेक खाती सांभाळली. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांनी मोठे व दीर्घकाळ योगदान दिले. नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष अशी त्यांनी पदे भूषवली पण विधान परिषदेचे सभापती म्हणून सलग तीन वेळा ते बिनविरोध विजयी झाले. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते त्यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले. पण, शिराळकरांसाठी ते ‘साहेब’ आपले साहेब म्हणूनच जिव्हाळय़ाचे राहिले. इतक्या दीर्घ वाटचालीत त्यांची कारर्कीद शुभ्र धवल राहिली. त्यांच्यावर एकही डाग पडला नाही अथवा आरोप झाले नाहीत. शिराळा तालुका डोंगरी आहे. राज्यात असे डोंगरी तालुके आहेत. या डोंगरी तालुक्यांना एकत्र करुन त्यांची परिषद घेऊन तेथील जनतेला व रोजगार मागणाऱया तरुणांना न्याय देण्यासाठी शिवाजीराव देशमुखांनी सरकारला निर्णय करायला लावले म्हणून डोंगरी विभागाचे शिल्पकार अशी बिरुदावली त्यांना जोडली जाते. शिराळा तालुक्यात चांदोली धरण, मोरणा धरण उभारण्यात निनाईदेवी साखर कारखाना उभारण्यात त्यांचे योगदान होते. आज पोलीस दलात आणि एस.टी महामंडळासह अनेक सरकारी-निमसरकारी नोकऱयात विविध पदावर काम करणारे कर्मचारी यांना निरपेक्षपणे देशमुखांनी भरतीच्या संधी दिल्या हे नाकारता येत नाही म्हणूनच देशमुखांचे राजकारण, समाजकारण वेगळे आणि स्वच्छ, धवल दिसते आहे व त्यांच्या जाण्याने अनेकांचे कंठ दाटून आले आहेत. जातीय वादाविरोधात आणि धर्मांध शक्ती विरोधात ते काँग्रेसचे सैनिक म्हणून ठामपणे उभे राहिले. काँग्रेसची एकतेची, समतेची आणि निधर्मी भूमिका मांडत राहिले. युती सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावरुनही आदर्श कामगिरी केली. ताकारी-म्हैसाळ योजनांना गती देऊन दुष्काळी तालुक्यांना न्याय दिला. स्व. वसंतदादा पाटील यांच्या राजकारणातील ते विश्वासू व महत्त्वपूर्ण घटक हेते. वसंतदादांचा राजकीय संन्यास असो अथवा शक्ती प्रदर्शन असो शिवाजीराव देशमुख त्या सर्व हालचालीत प्रमुख भूमिकेत असत. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे ज्या-ज्या वेळी प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा ते पक्षाबरोबर राहिले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तेव्हा आर. आर. पाटील, विष्णुअण्णा पाटील, जयंत पाटील असे दिग्गज त्यांचे सोबत गेले पण शिवाजीराव देशमुखांनी प्रकाशबापू पाटील, पतंगराव कदम यांना सोबत घेऊन काँग्रेसची पुर्नबांधणी केली आणि काँग्रेसची ध्वजा उंचावली. राजकारणाच्या डावपेचात ते कमी नव्हते. अनेकांनी त्यांना आडवे पाय घातले पण ते फारसा गाजावाजा न करता त्या सर्वांना पुरुन उरले. शिवाजीराव दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्या निधनाने आणखी एक लोकनेता काळाआड गेला आहे. त्यांना विनम्र अभिवादन !