|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दुधाच्या गोष्टी

दुधाच्या गोष्टी 

कवींची नेहमी थट्टा होते असे म्हणतात. पण ज्यांची थट्टा होते ते क्आपल्या देशात दुग्ध क्रांती होण्यापूर्वीचे सांगतोय. त्यावेळी दूध महाग तर होतेच, पण पैसे मोजून देखील सहजी मिळत नसे. पॉलिथिनच्या पिशवीतले दूध बाजारात यायचे होते. सरकारी दूध डेअरीवर काचेच्या बाटलीत दूध विकले जाई. पण त्यासाठी दुधाचे कार्ड मिळवावे लागे. ते कार्ड मिळवणे गुलबकावलीचे फूल मिळवण्याइतकेच अवघड होते. उच्चभ्रू आणि तालेवार मंडळींना सहज मिळायचे. कार्ड मिळाले म्हणजे दूध मिळेलच अशी शाश्वती मात्र नसे. पहाटे उठून लोक दूध केंद्रावर रांगा लावीत. रांगेतल्या शेवटच्या माणसाचा नंबर लागेतो दूध संपायचे आणि उरलेले लोक नशिबाला बोल लावीत घरी परतायचे.

कार्ड न लाभलेले आमच्यासारखे लोक गवळीदादांकडून दूध घेत. आमच्या भागात राहणारे बाबासाहेब सोनवणे आपली म्हैस घेऊन नोकराबरोबर दारात येत. त्यांच्याकडचे दूध खात्रीचे आणि दर्जेदार म्हणून त्याला अधिक मागणी होती. भल्या पहाटे आमच्या अंगणासमोर तीन वाडय़ांमधले सगळे बिऱहाडकरू आपापली पातेली घेऊन त्यांच्या प्रतीक्षेत गप्पा मारीत उभे राहत. बाबासाहेब आले की गर्दीवर एक नजर टाकून जो बिऱहाडकरू गैरहजर असेल त्याला एक खणखणीत आवाज देत. नोकर सर्वांदेखत दूध काढायचा. क्वचित दूध कमी-जास्त निघाले की एखाद्याला दूध कमी मिळे किंवा उरलेले दूध आग्रह करून दिले जाई. दुधाचे बिल हिशेब करून महिन्याच्या शेवटी द्यायची पद्धत होती. सणासुदीला जादा दुधासाठी दूधभट्टी नावाच्या केंद्रात जात असू. तिथे ओल्या गवताचा आणि सांडलेल्या दुधाचा खमंग दरवळ घमघमत असे. आत आपापल्या घागरी घेऊन विपेते बसलेले असत. दुधाचा भाव ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार, तळहाताची ओंजळ केली की त्यावर चमचाभर दूध चाखायला देत. तीन चार ठिकाणचे दूध चाखून झाल्यावर आम्ही पसंतीनुसार दूध खरेदी करायचो. दूध दुर्मीळ होते. फ्रिज घरोघरी अवतरले नव्हते. दूध साठवणे, विरजण, दही, ताक, लोणी आणि तूप बनवणे या प्रक्रिया क्वचितच शक्मय होत्या.

साखर न घालता प्यायलेल्या त्या किंचित पातळसर दुधाची कोमट गोड चव अजून जिभेवर आहे. केळीचे शिकरण, दूधभात आणि केव्हातरी होणारी तांदळाची खीर अशा पदार्थांची गोडी या दुधाने बेहद्द वाढवली होती आणि पुढच्या दशकांमध्ये धवल क्रांती झाली, अति घट्ट दूध मुबलक मिळू लागले तरी ती जुनी चव, तो गोडवा अजून विसरलो नाही.