|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर

बेक्झिटचा करार ब्रिटनला नामंजूर 

पंतप्रधान थेरेसा मे यांच्या अडचणीत वाढ : विरोधकांसह स्वपक्षीयांचा कराराला नकार,

वृत्तसंस्था/ लंडन 

 बेक्झिट करारावरील पराभवानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे पद अडचणीत आले आहे. कराराप्रकरणी पत्कराव्या लागलेल्या ऐतिहासिक पराभवानंतर विरोधी मजूर पक्षाने सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला असून यावर बुधवारी चर्चा झाल्याचे समजते.

पंतप्रधानांनी मांडलेला बेक्झिट करार संसदेने फेटाळल्यामुळे सरकारने सभागृहाचा विश्वास गमाविल्याचे स्पष्ट होत असल्याचे मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांनी म्हटले आहे. परंतु या अविश्वास प्रस्तावाबद्दल खासदारांमध्ये एकमत नसल्याचे बोलले जात आहे.

विरोधाभास सुरूच

थेरेसा यांना समर्थन देणारे पक्ष तसेच खासदारांनी आपण केवळ बेक्झिट कराराला विरोध केल्याचे सांगितले आहे. परंतु संसदेत पार पडणाऱया अविश्वास प्रस्तावावरील चर्चेमुळे स्थिती आणखीन स्पष्ट होईल. चर्चेनंतर थेरेसा यांनी सभागृहाचा विश्वास जिंकल्यास त्या सोमवारी संसदेत दुसरा मसुदा मांडणार आहेत. पण विश्वासदर्शक ठरावात पराभव झाल्यास त्यांना किंवा दुसऱया नेत्याला 14 दिवसांमध्ये सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या 14 दिवसांच्या कालावधीत विश्वासमत सिद्ध करण्यास अपयश आल्यास देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागणार आहे.

बेक्झिटवरील गोंधळ

बेक्झिटविषयक थेरेसा यांच्या कराराला केवळ 202 खासदारांनी समर्थन दिले तर 432 खासदारांनी त्याला विरोध दर्शविला आहे. थेरेसा यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या 118 खासदारांनी देखील या कराराच्या विरोधात मतदान केले आहे. तर काही विरोधी पक्षांच्या खासदारांनी या कराराला समर्थन दर्शविल्याने गोंधळ वाढला आहे. युरोपीय महासंघापासून विभक्त होण्यासाठी ब्रिटनकडे 29 मार्च 2019 पर्यंतची मुदत आहे.

खासदारांचे आक्षेप

बेक्झिट कराराला विरोध करणाऱया खासदारांचा सर्वात मोठा आक्षेप उत्तर आयर्लंडची सीमा खुली करण्याबद्दल आहे. करारानुसार अंतिम सहमती निर्माण होईपर्यंत उत्तर आयर्लंडची सीमा खुली ठेवली जाणार होती. तसेच तेथे युरोपीय महासंघाचे तपासणी केंद्र स्थापन केले जाणार होते. या अटींमुळे ब्रिटन युरोपीय महासंघाची वसाहत ठरणार असल्याची भीती ब्रिटिश खासदारांनी व्यक्त केली आहे.

अनेक मंत्र्यांचे राजीनामे

वादग्रस्त कराराप्रकरणी थेरेसा यांना त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांनी आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. मे यांच्या 6 मंत्र्यांनी या मुद्यावर राजीनामे दिले आहेत. डिसेंबर महिन्यात थेरेसा यांच्या सरकारमधील विज्ञान मंत्री सॅम गिमाह यांनी राजीनामा दिला होता. बेक्झिट देशहिताचे नसल्याचे म्हणत त्यांनी पद सोडले होते. उत्तर आयरिश पार्टीसमवेत त्यांच्याच पक्षाचे नेते देखील त्यांना विरोध करत आहेत.

थेरेसा यांच्यासमोरील पर्याय

कराराप्रकरणी पराभवानंतर थेरेसा यांच्यासमोर आता मोजकेच पर्याय शिल्लक राहिले आहेत. संसदेत पुन्हा प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळविण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. तर नव्याने युरोपीय महासंघासोबत वाटाघाटी करून एक नवा करार संसदेत त्या सादर करू शकतात. तसेच बेक्झिटवर पुन्हा जनमत चाचणी करविण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.