|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बियरच्या बाटलीवरील देवतांच्या चित्रांना हिंदूंचा विरोध

बियरच्या बाटलीवरील देवतांच्या चित्रांना हिंदूंचा विरोध 

नवी दिल्ली

 ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने स्वतःच्या बियर बाटल्यांवर देवी-देवतांच्या चित्रांचा वापर केल्याचे समोर आल्याने जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजमाध्यमांवर याप्रकरणी जगभरातील हिंदू स्वतःचा संताप व्यक्त करत आहेत.

 हिंदूंनी याप्रकरणी भारत सरकारला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेशमंत्री सुषमा स्वराज यांना टॅग करत लोकांनी ट्विट केले आहे. तर बियर कंपनीच्या विरोधात ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.

कंपनीने स्वतःच्या जाहिरातीत बियर बॉटलवर भगवान गणेश यांच्या चित्राचा वापर केला आहे. दक्षिण भारतासह अनेक राज्यांमध्ये बियर कंपनीची ही आक्षेपार्ह जाहिरात व्हॉट्सऍप तसेच अन्य समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहे. बियर बॉटलवर देवी-देवतांच्या चित्रांचा वापर करणे हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ब्रूकवेल युनियन या कंपनीने हिंदू देवतांच्या चित्रांचा वापर केला आहे. पंतप्रधान मोदी, विदेशमंत्री स्वराज तसेच अनेक दिग्गज भारतीय नेत्यांसमवेत ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान माल्कन टर्नबुल यांना देखील टॅग करत  हस्तक्षेप करण्याची मागणी लोकांनी केली आहे. बियर बॉटलवरील भगवान गणेशाचे चित्र हटविण्यासोबतच संबंधित कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी असे आवाहन ट्विटरवर हिंदू धर्मीयांकडून केले जात आहे.