|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 24 जानेवारीला ठरणार सीबीआयचे नवे संचालक

24 जानेवारीला ठरणार सीबीआयचे नवे संचालक 

उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी 24 जानेवारीला उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना निलंबित केल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. आयपीएस अधिकारी नागेश्वर राव सध्या हंगामी सीबीआय संचालक म्हणून कामकाज संभाळत आहेत. सीबीआय संचालकपद रिक्त ठेवल्याबद्दल काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरु होती.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मागील आठवडय़ात झालेल्या उच्चस्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविले होते. त्यानंतर वर्मा यांची गुरुवारी रात्रीच अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांतच त्यांनी राजीनामा देऊन सरकारी सेवेतून निवृत्ती स्वीकारली होती.

आलोक वर्मा हे 1979 बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सीबीआयच्या आजपर्यंतच्या इतिहासातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून कमी झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत. आलोक वर्मा यांच्या विरोधामध्ये उच्चस्तरीय निवड समितीपुढे एकूण 8 आरोप मांडण्यात आले होते. उच्चस्तरीय निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि न्यायाधीश ए. के. सिक्री (सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्याद्वारे नियुक्त) यांचा समावेश होता.

बैठकीच्या तारखेवरून दुमत…

सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करण्यासाठीच्या बैठकीवरून उच्चाधिकार समितीतील सदस्यांमध्ये दुमत असल्याचे दिसून आले. सरकारने 21 जानेवारीला बैठकीचा प्रस्ताव दिला होता. पण मल्लिकार्जून खर्गे यांना 24 किंवा 25 जानेवारीला बैठक हवी होती असे सूत्रांनी सांगितले. अखेर परस्परसहमतीने नव्या संचालकांची निवड करण्यासाठी 24 जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली.