|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हय़ातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हय़ातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 

विविध पक्ष प्रतिनिधींकडे मतदार याद्या सुपूर्द :

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या वर्षभरापासून मतदार याद्यांचे काम सुरू होते. मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांची नावे दाखल करणे, मयत झालेल्या मतदारांची नावे कमी करणे, याच बरोबर पत्ता बदललेल्या व्यक्तींच्या नावांमध्ये बदल, दोनवेळा नावे असलेली कमी करणे याचे काम सुरू होते. आता जिल्हय़ामध्ये नव्याने 66 हजार 901 मतदारांची नावे दाखल झाली आहेत तर 63 हजार 135 नावे कमी झाली आहेत. 10 ऑक्टोबर 2018 पासून आलेल्या अर्जांची छाननी करून ही नावे दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा उपस्थित होते.

आता लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे मतदार याद्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हय़ामध्ये ज्या व्यक्तीला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांची नावे दाखल करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्हय़ात आता एकूण 37 लाख 22 हजार 34 मतदार आहेत. यामध्ये 18 लाख 87 हजार 283 पुरुष तर 18 लाख 34 हजार 751 महिला मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

मतदान केंद्रांनुसार ही माहिती जमा करण्यात आली आहे. ऑनलाईनद्वारे तसेच थेट अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्या अर्जांचा विचार करून तसेच छाननी करून ही नावे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. मतदारांची संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ामध्ये 4 हजार 434 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.

100 वर्षे झालेले 67 मतदार

जिल्हय़ात 100 वर्षे पूर्ण झालेले एकूण 182 मतदार होते. मात्र, त्यामधील काही जणांचा अलीकडेच मृत्यू झाल्यामुळे आता 100 वर्षे झालेले 67 मतदार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

चिकोडीतील बोगस मतदारांची केली चौकशी

चिकोडीमध्ये 8 हजार 834 बोगस मतदार असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार 6 हजार 220 जणांना नोटिसा देऊन पंचनामा केला होता. यामधील काही मतदार बऱयाच दिवसांपासून बाहेरगावी राहिले होते. त्यांची नावे  कमी करण्यात आली आहेत. या एकूण मतदारांमध्ये 1600 जणांची नावे मतदार यादीत दाखल करण्यात आली असून इतर मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

विविध पक्ष प्रतिनिधींकडे मतदार याद्या सुपूर्द

नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्या मतदार याद्यांची मतदान केंद्रानुसार छाननी करा. त्यामध्ये काही दोष असल्यास दुरुस्ती केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी प्रतिनिधींना सांगितले. नवीन मतदारांनाही अर्ज करण्यास अजून मुभा आहे. मात्र, हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ज्या चुका आहेत, तसेच ज्या व्यक्तींना नावाची दुरुस्ती किंवा नावे दाखल करायची आहेत, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.

 मतदारांसाठी हेल्पलाईन

ज्या मतदारांना मतदार याद्यांबाबत तसेच आपल्या नावातील दुरुस्तीबाबत सहकार्य हवे असेल तर त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जिल्हय़ाचा कोड क्रमांक लावून त्यानंतर 1950 हा क्रमांक दाबून मतदार याद्यांबाबत कोणीही माहिती घेऊ शकते. याचबरोबर एसएमएसची सुविधाही करण्यात आली असून माहिती पाठवायची असल्यास मोबाईल क्रमांक 8277816154 वर पाठवावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.