|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गेल्या चार महिन्यांचे वेतन द्या

गेल्या चार महिन्यांचे वेतन द्या 

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या चार महिन्यांपासून सफाई कर्मचाऱयांना वेतन नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांनी अनेकवेळा आंदोलन केले तरीदेखील महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे सफाई कर्मचाऱयांनी बुधवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन तातडीने आम्हाला वेतन द्यावे, अशी मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर शनिवारी आम्हाला वेतन देतो, असे आश्वासन दिले होते. तरीदेखील अद्याप आम्हाला वेतन दिले नाही. त्यामुळे आम्ही जीवन जगू कसे? असा सवाल या कर्मचाऱयांनी केला आहे. जवळपास 1100 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आम्ही काम करत आहे. सकाळी उठून शहरातील कचरा गोळा करतो, असे असताना आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

चार महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे आम्हाला जीवन जगणे अवघड झाले आहे. तातडीने आम्हाला वेतन द्यावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा  सफाई कर्मचाऱयांनी दिला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे हे निवेदन देण्यात आले. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेश बन्न, मोहन साके, अशोक चव्हाण, परशुराम कोलकार, राजेंद्र देमट्टी, राजू कोलकार, चंद्रकांत देवट्टी, विठ्ठल तळवार, श्रीधर कळमनी, रमेश गणाचारी यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते.