|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीर जवान रोहितवर आज अंत्यसंस्कार

वीर जवान रोहितवर आज अंत्यसंस्कार 

आडी येथे प्रशासनाची जय्यत तयारी : पहाटे पार्थिव गावात दाखल होणार

प्रतिनिधी/ निपाणी

आडी येथील जवान रोहित देवर्डे यांना हिमस्खलन होऊन वीरमरण प्राप्त झाल्याची घटना सोमवारी पहाटे सिक्कीम-गंगटोक येथे घडली होती. त्यामुळे आडीसह परिसर गेल्या तीन दिवसापासून शोकसागरात बुडाल्याचे दिसत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रोहित यांचे पार्थिव पुण्याहून आडी येथे दाखल होणार आहे. यानंतर लगेचच गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वीर जवान रोहितच्या अचानक जाण्याने देवर्डे कुटुंबियांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचबरोबर आडीसह परिसरही गेले तीन दिवस सुन्न झाला आहे. भारतमातेच्या या पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रशासनातर्फेही जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी तहसीलदार महादेव बनसी, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी अंत्ययात्रेच्या मार्गाची पाहणी केली. माळभागावरील डीपीईपी शाळेच्या आवारात पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून यानंतर येथून जवळच असलेल्या कुस्ती मैदानालगतच्या जागेत अंत्यविधी होणार आहे. या जागेचीही पाहणी करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान वीरजवान रोहित देवर्डे यांच्या निधनानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात शोकसभा व बैठक घेण्यात आली. यावेळी बुधवारी व गुरुवारी आडी बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार बुधवारी दिवसभर गाव तसेच माळभागावरील सर्व दुकाने बंद राहिली. यामुळे सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच गुरुवारी गाव व माळभागावरील प्राथमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी अंत्ययात्रेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन आहे.

प्रशासनाबरोबर युवक मंडळे तसेच ग्रामस्थांकडून अंत्यविधीची तयारी सुरू आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे. युवक मंडळांकडून मार्गावर रांगोळी रेखाटण्यात आली आहे. भावनिक होऊन सर्वच युवक मंडळांसह ग्रामस्थ अंत्यविधीच्या तयारीत गुंतले आहेत.

पोलीस फौजफाटा दाखल

बुधवारी रात्री 9 च्या सुमारास दिल्लीहून पुणे विमानतळावर पार्थिव दाखल झाले. येथून विशेष रुग्णवाहिकेद्वारे पहाटे 5.30 च्या सुमारास पार्थिव आडी येथे येणार आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीच येथे आवश्यक पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. गुरुवारी पहाटे प्रांताधिकारी, तहसीलदार येथे कोगनोळी टोलनाका येथून पार्थिवासोबत येणार आहेत. अंत्यदर्शन तसेच अंत्यविधीच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, देशभक्त, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्याची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.