|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे !

पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हे ! 

ऑनलाईन टीम  / पुणे :

 पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे आज त्यांच्या कार्यकाळातील पहिलेच 2019-2020 वर्षासाठीचे  पालिकेसाठीचे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करणार आहेत. मागच्या वर्षी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5,397 कोटींचे पालिकेचे अंदाजपत्रक मांडले. यामध्ये या प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला होता.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रस्तावित केलेले प्रकल्प

1) सुनियोजित आणि समान पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 492.46 कोटी तरतूद

2) पर्यावरण आणि शाश्वत विकाससंबंधी प्रकल्पांसाठी 309 कोटींची तरतूद

3) सुलभ आणि पदपथ विकसित करणे, शहरी एकात्मिक सायकल आराखड्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर विकसन आणि पब्लिक बायसिकल शेअरिंग व्यवस्था निर्माण करणे, पीएमपीएमएल सार्वजनिक वाहतुक यांसारख्या वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांसाठी 563  कोटींची तरतूद केली होती.

4) रस्ते विकास आणि शहरात विविध ठिकाणी पूल बांधण्यासाठी 401.55 कोटींची तरतूद

5) घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी 87 कोटींची तरतूद

कागदोपत्री हे प्रकल्प चांगले वाटत असले तरीही या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी निधी उभारायचा कुठून हा एक मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता. पालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा याचा ताळेबंद बसवणे हा एक मोठा प्रश्न तेव्हाचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर होता आणि आताचे आयुक्त सौरभ राव यांच्यासमोरही असणार आहे. 2017-2018 सालमध्ये महापालिकेसाठी जमेचे उद्दिष्ट 5912 कोटी रुपये होते. मात्र डिसेंबर 2017 च्या अखेर 3163 कोटीच जमा झाले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन 2018-2019 सालाच्या अंदाजपत्रकात हे 5397 कोटींचे सादर करण्यात आले आणि उत्पन्नासाठी मिळकतकर आणि वस्तू-सेवा करावर भिस्त ठेवण्यात आली. या प्रमाणात पालिकेचे उत्पन्न कसे वाढवायचे हा एक प्रश्न आहेच. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कुणाल कुमार यांनी मालमत्ता करामध्ये 15 टक्के वाढ सुचवली होती. या वाढवलेल्या करामधून 135 कोटींचा जास्तीचा महसूल गोळा होईल अशी अपेक्षा होती. पालिकेचे  उत्पन्न वाढवण्यासाठी सौरभ राव यांनी अंदाजपत्रकाच्या आधीच्या बैठकांमध्ये नागरिकांवर बोजा पाडणाऱ्या कर वाढीचे पर्याय सुचवलेत असे  खुद्द पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे. दरम्यान, येणाऱ्या वित्तीय तुटीबाबतीत विरोधकांनी मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले आहे. महापालिकेची खालावत जाणारी आर्थिक स्थिती, शहराच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि पुणेकरांच्या प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा याचं गणित सौरभ राव कसे बसवतात याची उत्सुकता आहे.