|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » साताऱ्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे निधन

साताऱ्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवणारे माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे निधन 

ऑनलाईन टीम / सातारा :

सातारा – राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मणराव पाटील यांचे निधन झाले. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 81 वर्षांचे होते. शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. साताऱ्यात सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला. आपल्या लाडक्या नेत्यासाठी वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.

लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. महिनाभरापूर्वी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर राहिल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतून साताऱ्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर विकासनगर येथील त्यांच्या घरी थोडावेळ अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दर्शनासाठी ठेऊन बोपेगाव या त्यांच्या मुळगावी नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या मागे पत्नी सुमन पाटील, मुलगा मिलिंद, नितीन, आमदार मकरंद पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

लक्ष्मण पाटील हे 1960 साली ते बोपेगावचे सरपंच झाले. त्यानंतर वाई पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी 10 वर्षे कर्तृत्व सिद्ध केले. सन 1980 साली लक्ष्मणराव जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांनी सलग 11 वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला. सन 1999 साली ना. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले.