|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उद्धवांना राधा दर्शन

उद्धवांना राधा दर्शन 

त्या गोपी उद्धवाला म्हणतात-उद्धवा! सर्वप्रथम आम्ही श्रीकृष्णाचे दर्शन नंदमहोत्सवाचे दिवशी घेतले होते. आणि तेव्हापासून त्याने अशी जादू केली आहे की आम्ही त्याच्याच झालेल्या आहोत. उद्धवा, आता या हृदयात आणखी कोणासाठी स्थानच नाही. चालता फिरता, जागता झोपता, विचारात स्वप्नात त्या श्यामसुंदराचीच मूर्ति सामावलेली असते. उद्धवा! कृष्णाने आम्हाला रासलीलेचा अवर्णनीय आनंद दिला आणि आता आम्हाला विसरून गेला! असा नि÷tर का झाला आहे तो? उद्धव म्हणाला-नाही! नाही! माझे स्वामी असे नाहीत. ते तर तुम्हा सर्वांची सारखी आठवण करीत असतात. गोपी म्हणतात-उद्धवा! तुम्हाला जर श्रीकृष्णाच्या मूळ स्वरूपाचें ज्ञान असते तर तुम्ही येथे आलाच नसता. तुम्हाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टींनी भ्रमात टाकले आहे. ज्याला त्याच्या खऱया स्वरूपाचें दर्शन झाले आहे तो त्याला केव्हाच सोडू शकत नाही. तुम्ही त्याला सोडून आला आहात म्हणून असे वाटते की तुम्ही त्याला चांगले ओळखलेच नाही. अहो उद्धवा! तुम्ही कोणाचा संदेश घेऊन आला आहांत? या अनाथ व्रजाला ते केव्हा सनाथ करणार आहेत? गोपी वेडय़ासारख्या होऊन प्रलाप करू लागल्या. झाडांमध्ये श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन झाडांनाच आलिंगन देऊ लागल्या. हे आहेत माझे श्रीकृष्ण, असे म्हणू लागल्या.

आता उद्धव अधिक विचारमग्न होत चालले आहेत. ह्या गोपी, हे नंद यशोदा पाळण्यांत, घरात, अंगणांत, झाडांत, पाण्यांत, जमिनीच्या कणाकणांत श्रीकृष्ण ब्रह्माच्या अस्तित्वाचा अनुभव घेत आहेत. इकडे मी जो वर्षानुवर्षे व्यापक ब्रह्माचा वेदान्त घोकत, चिंतन करीत आलो आहे त्या मला त्यांचे दर्शन आणि अनुभव होऊ शकलेला नाही. माझें शुष्क ज्ञान निष्फळच राहिले! माझे ज्ञान पांडित्य निरर्थकच राहिलें! मी बुद्धी चालवीत राहिलो. वेदान्ताच्या सिद्धान्तात घोटाळत राहिलो. परंतु ब्रह्माचा अनुभव घेऊ शकलो नाही. ज्ञानार्जन निराळे आणि ज्ञानाचा अनुभव निराळा. ज्ञानार्जनाला महत्त्व नाही असे नाही. पण ज्ञानानुभवाचें महत्त्व अधिक आहे.

सख्या उद्धवांना राधिकेच्या दर्शनासाठी घेऊन गेल्या. सख्यांच्या घोळक्मयात विराजमान असलेल्या राधिकेची शोभा अवर्णनीय आहे. साधा शृंगार, मुखावर दिव्य तेजाची प्रभा, सात्त्विकता आणि प्रेमाची मूर्ति, जगताचे आनंददाते श्रीकृष्णांची आनंददायिनी अशा राधिकेला उद्धवांनी साष्टांग नमस्कार केला.

परंतु राधिकेचें शरीर श्रीकृष्णाच्या विरहामुळे वाळलेल्या फुलासारखे होऊन गेले होते. मन व्याकुळ आणि व्यथित होते. केस कोरडे, करडे आणि विस्कटलेले होते. तोंडातून वेदनाभरित निःश्वास चालले होते आणि डोळय़ातून अश्रुधारा वाहात होत्या. ती एक प्रकारच्या दुखावलेल्या वेलीसारखी दिसत होती. राधा उद्धवांना विचारू लागली-तुम्ही कोणत्या श्रीकृष्णाचा निरोप आणला आहे? माझे श्रीकृष्ण तर येथेच आहेत. मी वियोगिनी नाही. आतील संयोगिता राधा श्रीकृष्णाच्या चिंतनात लीन होऊन गेली आहे. ती एक प्रकारे समाधी अवस्थेत आहे. उद्धवांनी पुनः नमस्कार केला आणि म्हटले-मी मथुरेहून आलो आहे. श्रीकृष्ण लवकरच येथे येणार आहेत.