|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे

रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा प्रभार बंडय़ा साळवींकडे 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित 3 महिन्यांसाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदाचा प्रभार उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुरूवारी साळवी यांनी नगराध्यक्षपदाची पदाची सूत्रे स्वीकारली. नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे अधिक गतीमान करतानाच काही नव्या विकास योजनाही राबवणार असल्याचे साळवी यांनी यावेळी सांगितले.

2014च्या  लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी म्हणून राहुल पंडीत यांनी प्रभावी कामगिरी केली. होती. त्याचीच दखल घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही पंडीत यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना नगराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार नगराध्यक्ष राहुल पंडित 17 जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी रितसर रजेवर गेले आहेत.

पंडीत यांच्या अनुपस्थितीत प्रभारी नगराध्यक्षपदाचा कारभार शिवसेनेचेचे उपनगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांच्याकडे सोपवण्यात आला. नेत्यांच्या उपस्थितीत बंडय़ा साळवी यांना गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक मधुकर घोसाळे, राजन शेटय़े, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, माजी उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, स्वीकृत नगरसेवक नितीन तळेकर, प्रशांत साळुंखे, किशोर मोरे, नगरसेविका रशिदा गोदड, शहर आघाडीप्रमुख मनीषा बामणे आदी उपस्थित होते.