|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उपमहापौरांच्याच फाईली अडविल्या!

उपमहापौरांच्याच फाईली अडविल्या! 

प्रतिनिधी /सांगली :

महापालिकेच्या प्रशासनाकडून फाईल अडविण्याचा उद्योग सुरूच आहे. त्यामुळे  नगरसेवक चांगलेच वैतागले आहेत. उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्या प्रभागातील विकासकामांच्या फाईली अडविल्याने उपमहापौर सूर्यवंशी यांचा गुरूवारी रागाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी थेट स्थायी समिती घुसून अधिकाऱयांकडून या फाईलीवर सहय़ा घेतल्या. यामुळे प्रशासन पदाधिकाऱयांच्याही फाईल अडवत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

महापालिकेची स्थायी समितीची सभा महापालिकेच्या राजभाऊ जगदाळे सभागृहात सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक उपमहापौर धीरज सूर्यवंशी हे स्थायी समितीच्या स भागृहात आले त्यांनी काही अधिकाऱयांनी थेट धारेवर धरले आणि जाणूनबुजून विकासकामांच्या फाईली अडविल्या जात असल्याचा आरोप केला. त्यावेळी स्थायी समिती सदस्यांनी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना स्थायीमध्ये बसण्याचा आग्रह केला पण ते स्थायीमध्ये थांबले नाहीत. त्यांनी अधिकाऱयांना बाहेर नेले आणि त्यांच्याकडून या फाईली क्लिअर करून घेतल्या. दरम्यान, पदाधिकाऱयांच्याच विकासकामांच्या फाईली अडविल्या जात आहेत. त्यामध्ये सामान्य नगरसेवकांची हालत काय? असा सवाल यावेळी स्थायी समिती सदस्यांनी यावेळी केला.

दरम्यान, उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी त्यांनी दिलेल्या विकासकामांच्या सर्व फाईलीची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाला घेण्यास सांगितली. आणि त्यानंतर शहर अभियंता तसेच नगररचना विभागाच्या अधिकाऱयांना त्यांनी केबिनमध्ये बोलावून घेतले आणि त्यांना चांगलेच झाडले. तसेच या फाईली का थांबल्या होत्या असा थेट सवाल त्यांना केला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. प्रशासनाकडून यावर तात्पुरते उत्तर देऊन यावर पडदा टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पण, उपमहापौर सूर्यवंशी भडकल्याने प्रशासनाच्या कामांचे चांगलेच धिंडवडे निघाले आहेत.

फाईली तातडीने क्लिअर करण्याची गरज : सूर्यवंशी

प्रभागातील विविध विकासकामे तातडीने करण्यासाठी नागरिकांचा कायम रेटा असतो. त्यामुळे आम्ही ही कामे करण्यासाठी फाईली तयार करून घेत असतो. पण या फाईली अनेक दिवस अनेक अधिकाऱयांच्या टेबलवर पडूनच असतात. त्यामुळे ही विकासकामे होण्यास विलंब होत असल्याने या फाईली आपण क्लिअर करून घेण्यासाठी अधिकाऱयांना थेट जाब विचारला असे उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच सर्व विकासकामांच्या फाईली तातडीने क्लिअर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.