|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » प्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन

प्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रभू रामचंद्र हे उत्तर भारतीय होते, असे वक्तव्य भाजपच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. भगवान श्रीराम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात पूनम महाजन बोलत होत्या.

महाराष्ट्र आणि उत्तर भारताचे नाते फार जुने आहे. प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते, असे पूनम महाजन म्हणताच उपस्थितांचे कान टवकारले. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. महाजन यांच्या खांद्यावर भाजयुमो अर्थात युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेने उत्तर भारतीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता भाजप खासदार पूनम महाजन यांनीही प्रभू श्रीरामांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे यूपीशी नाते जोडल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरासाठी अध्यादेश न काढता कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.