|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी

आंबोली विकासाच्या स्वप्नावर पाणी 

लाखोंचा खर्च करूनही भकास : पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेले पर्यटनस्थळ

सुविधांअभावी पर्यटकांची होतेय निराशा : स्थानिकांनी दिला आंदोलनाचा इशारा 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे आंबोली पर्यटनस्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध कामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे. याला शासनच जबबदार असल्याने आंबोली पर्यटन क्षेत्राच्या विकासात अडथळा आला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी एक बैठकीत घेत शासनाने ठोस पावले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिमहाबळेश्वर म्हणून प्रसिध्द असलेल्या आंबोलीसाठी शासनाने विकासात्मक धोरणे राबविली. त्यानंतर आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे आहेत. याला लोकप्रतिनिधी आणि शासन जबबदार असल्याचे दिसत आहे.

पर्यटनासाठी लाखो रुपयांचा निधी येऊनही आंबोलीची दुरवस्था कायम आहे.  मग निधी जातो तरी कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्व पर्यटनस्थळांची दुरवस्था झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाठ फिरवली तर येत्या एक-दोन वर्षात पर्यटन बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. आंबोली पर्यटन क्षेत्रात यापूर्वी विविध विकासकामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही कामे अपूर्णावस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किमी पायपीट करावी लागते. पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे आश्वसन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु त्याचे पालन झाले नाही.

वनविभागाचे हर्बेरियम सेंटर, फुलपाखरू उद्यान, जकातवाडी तलाव सुशोभिकरण, वनउद्यान डागडुजी, ठिकठिकाणी पथदीप, पॉईंटकडे जाणारे रस्ते, जंगल सफरीकडे जाणारे रस्ते अशी अनेक कामे आज अपूर्णावस्थेत आहेत. या प्रकल्पांच्या विकासाला खिळ घातली तरी कोणी? पालकमत्र्यांनी आंबोली पर्यटनस्थळ दत्तक घेतले होते. त्याचे काय झाले, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

आंबोलीमार्गे गोव्याला जातात लाखो पर्यटक

लाखो पर्यटक आंबोलीमार्गे गोव्याकडे जात असतात. या पर्यटकांना आंबोलीत कोणत्याच गोष्टींचा आस्वाद घेता येत नाही. पर्यटक येण्याच्या अपेक्षेने हॉटेल व्यवसायिकांनी लाखो रुपये खर्च करून पर्यटक निवासाची सोय केली होती. परंतु दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये घट झाल्यामुळे व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत.

आंबोलीच्या विकासाची स्वप्ने दाखवून मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने आंबोली भकास होत आहे. त्यामुळेच शासनाच्या व अधिकाऱयांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला रामचंद्र गावडे, गजानन पालेकर, शशिकांत गावडे, महेश पावसकर, दिलीप सावंत, विष्णू चव्हाण, हेमंत ओगले, अंकुश कदम, प्रकाश गावडे, पांडुरंग गावडे, प्रकाश गुरव, नमिता राऊत, अक्षता गावडे, तुकाराम पाटील, राजेंद्र गावडे, उमेश पडते, दर्शन गावडे, शिवाजी गावडे, उल्हास गावडे उपस्थित होते. आंबोलीच्या विकासाबद्दल ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.