|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » भूतान, नेपाळला जाण्यासाठी ‘आधार’वैध ओळखपत्र

भूतान, नेपाळला जाण्यासाठी ‘आधार’वैध ओळखपत्र 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भूतान, नेपाळला जाण्यासाठी आता 15 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड वैध कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिसा संदर्भातील माहिती देणाऱया जाहिरातीत हे नमूद करण्यात आले आहे. 15 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्ती वगळता अन्य वयोगटातील व्यक्तींना मात्र या दोन देशांमधील प्रवासासाठी आधारचा आधार घेता येणार नाही. भूतान आणि नेपाळ या दोन देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते. तेथे जाताना लागणाऱया वैध ओळखपत्रांबाबत जारी केलेल्या नियमावलीत हा नवा नियम समाविष्ट करण्यात आला आहे.

भारतीयांकडे भारत सरकारतर्फे जारी केलेले एक छायाचित्र ओळखपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असेल तर व्हिसाची आवश्यकता नाही, असे ही नियमावली सांगते. यापूर्वीच्या नियमावलीनुसार, 15 वर्षे वयाखालील आणि 65 वर्षे वयावरील व्यक्तींना या दोन देशांमध्ये जाण्यासाठी ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकारचे आरोग्य सेवा कार्ड किंवा रेशन कार्ड सोबत ठेवावे लागत असे. आधार कार्डाचा आधीच्या नियमावलीत समावेश नव्हता. आता या यादीत आधार कार्डाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने दिली आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा भूतानला लागून आहे. तेथील हायड्रोक्लोरिक पॉवर आणि बांधकाम उद्योगात सुमारे 60 हजार भारतीय कां करतात. नेपाळमध्येही सुमारे सहा लाख भारतीय राहतात, अशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती आहे.