|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पंढरपुरातील विठ्ठल मंदिर धोक्यात ; पुरातत्व विभाग स्ट्रक्चरल ऑडिट करणार

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर धोक्यात ; पुरातत्व विभाग स्ट्रक्चरल ऑडिट करणार 

ऑनलाईन टीम / पंढरपूर :

लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूला नंतरच्या काळात झालेल्या अवास्तव बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. ही सर्व चुकीची बांधकामे हटवून गाभाऱयातही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी आज केला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अवास्तव बांधकामांमुळे छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. आता संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार असून यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समितीपुढे ठेवणार आहेत. विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जात असले तरी अनेक अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्या काळाच्याही पूर्वीची असल्याचे सांगितले जाते. मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून त्याच्या यादवकालीन साधर्म्याची अनेक उदाहरणे इथल्या शिल्पकलेवरून दिसून येतात. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो आहे. अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचे मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला. मंदिराचा मुख्य भाग असणाऱया विठ्ठल गाभाऱयात देखील नंतरच्या काळात अवास्तव दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झाला आहे. गाभाऱयात भितींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशांमुळे गाभाऱयातील आर्द्रता मूर्तीस घातक बनू लागली आहे. गाभाऱयात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरुप सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. मंदिरातील दगडांना दिलेले रंग दगडी वास्तवात इतर नव्या बांधकामांचे टाकलेले बोजे, धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिर आणि विठुरायाच्या मूर्तीसाठी आयुष्य कमी करणारे ठरत आहेत. याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून हा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत. आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.