|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शताब्दी एक्स्प्रेस सर्वात स्वच्छ

शताब्दी एक्स्प्रेस सर्वात स्वच्छ 

रेल्वेच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष : दुरंतो सर्वात अस्वच्छ रेल्वेगाडी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या 77 प्रीमियम रेल्वेंमध्ये पुणे-सिकंदराबाद तसेच हावडा-रांची समवेत तीन शताब्दी एक्स्प्रेस सर्वाधिक स्वच्छ ठरल्या आहेत. तर तीन दुरंतो एक्स्प्रेस सर्वात अस्वच्छ आढळल्या आहेत. 23 राजधानी एक्स्प्रेसमध्ये मुंबई-नवी दिल्ली राजधानी  सर्वात स्वच्छ आढळून आली आहे. तर नवी दिल्ली-दिब्रूगढ राजधानी एक्स्प्रेस सर्वात गलिच्छ आढळून आल्याची माहिती रेल्वेने एका सर्वेक्षणानंतर दिली आहे.

मागील वर्षी करण्यात आलेल्या ‘ट्रेन क्लीनिलेस सर्व्हे 2018’मध्ये 210 रेल्वेगाडय़ांची पडताळणी करण्यात आली. या रेल्वेगाडय़ा प्रीमियम तसेच नॉन प्रीमियम या शेणींमध्ये विभागण्यात आल्या होत्या. सर्वेक्षणात 15000 प्रवाशांनी रेल्वेगाडय़ांना दोन मापदंडांवर मानांकन दिले, ज्यात शौचालयाची सफाई तसेच डब्यातील स्वच्छता या निकषांचा समावेश होता.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु स्वच्छता मापदंडांवर रेल्वे स्थानकांचे मानांकन जाहीर करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या पद्धतीबद्दल काही मुद्दे विचाराधीन असल्याने सरकारकडून ही माहिती अद्याप प्रकाशित करण्यात आली नसल्याचे केंद्र सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. रेल्वेच्या एन्व्हॉयरमेंट अँड हाउसकीपिंग मॅनेजमेंट विभागाकडून करण्यात आलेले अशाप्रकारचे हे पहिलेच सर्वेक्षण आहे. प्रोसेस ऑडिट, थेट निरीक्षण तसेच प्रवाशांचा प्रतिसाद इत्यादी बाबींची सर्वेक्षणाकरता मदत घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात प्रवाशांनी शौचालयाची सफाई, हाउसकीपिंग स्टाफचे काम, बेड रोल्सची स्वच्छता, पेस्ट मॅनेजमेंटचा प्रभावीपणा आणि डस्टबिनची उपलब्धता इत्यादींच्या आधारावर 0 ते 5 पर्यंत मानांकन प्रदान केले आहे.