|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नेपाळ, भूतान दौऱयासाठी ‘आधार’ ठरणार वैध

नेपाळ, भूतान दौऱयासाठी ‘आधार’ ठरणार वैध 

ठराविक वयोगटातील नागरिकांसाठीच सुविधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 भारताचे 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे तसेच 65 वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ आणि भूतानच्या प्रवासाकरता आधारकार्डचा वैध ओळखपत्र म्हणून वापर करू शकतील. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिसा विषयक जाहिरातीत याचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या प्रवासाकरता भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही.

नेपाळ आणि भूतानला जाणाऱया नागरिकांकडे वैध पारपत्र, भारत सरकारने प्रदान केलेले ओळखपत्र किंवा मतदार ओळखपत्र असेल तर त्याला व्हिसाची गरज भासणार नाही, असे जाहिरातीत म्हटले गेले आहे. यापूर्वी 65 वर्षांहून अधिक आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक दोन्ही देशांच्या प्रवासाकरता पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, रेशनकार्ड इत्यादी ओळखपत्रे दाखवू शकत होते, परंतु त्यांना आधारचा अवलंब करता येत नव्हता.

नागरिकांसाठी काठमांडूतील दूतावासाने उपलब्ध केलेले प्रमाणपत्र दोन्ही देशांदरम्यान प्रवासाकरता स्वीकारार्ह प्रवास दस्तऐवज नसल्याचे अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे. परंतु नेपाळमधील दूतावासाकडून प्रदान करण्यात आलेले आपत्कालीन प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र भारतात परतण्याच्या प्रवासाकरता स्वीकारार्ह ठरणार आहे. 15 ते 18 वर्षांच्या वयोगटातील मुलांना त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रदान करण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारावर भारत आणि नेपाळदरम्यान प्रवासाची अनुमती दिली जाणार आहे. भूतानचा दौरा करणाऱया नागरिकांकडभारतीय पारपत्र किंवा मतदार ओळखपत्र असायला हवे, असे अधिकाऱयाने सांगितले.