|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आघाडी सरकारमधील केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काय केले?

आघाडी सरकारमधील केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काय केले? 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्याचा देशवासियांना अभिमान वाटावा असेच चित्र दिसते आहे. खासदार, आमदार नसतानाही शिस्तबद्ध पद्धतीने एवढय़ा संख्येने आला आहात. माझे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण करुन दिलीत. मला घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते हयात असताना मी साताऱयाला येत होतो, असे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, शेतकऱयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आता प्रगतशील होवू लागला आहे, असे असताना आघाडी सरकारच्या काळात याच पश्चिम महाराष्ट्रातले केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनी काय शेतकऱयांसाठी केले?, याच उत्तर त्यांनी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिह्यात येण्याची विनंती जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बुथ कमिटीशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बोलणार होते. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महेश शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, प्राची शहाणे, किशोर  पंडित यांच्यासह जिह्यातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱयांना बलशाली करण्यासाठी प्रयत्नशील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील जनतेला सातारकरांची ही उपस्थिती प्रेरणा देणारी ठरेल. माझे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण करुन दिली. त्यांनी माझे जीवन घडवले. त्यांच्यासोबत मी साताऱयाला अनेकदा आलो होतो. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 2022 पर्यंत त्याची अनुभूती येईलच. शेतकऱयांना कसे बलशाली बनवता येईल याकरिता आमचे केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बदलत चालला आहे. यापूर्वीच्या सरकारने 60 वर्षामध्ये काय केले?, गेल्या साठ वर्षात 32 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षात 42 लाख हेक्टर झाली आहे. तीन वर्षात 20 टक्के वाढले आहे. जलयुक्त शिवारची महत्त्वाची कामे झाली आहेत. शेतकऱयांना वीजेची कनेक्शन दिली गेली आहेत.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार

काँग्रेसचे पंधरा वर्षाच्या सरकारमध्ये 450 करोड मदत केली होती. गेल्या तीन वर्षात 1400 करोडची मदत दिली असून शेतकऱयांनी तयार केलेला शेतीमाल आघाडी सरकारच्या काळात 415 करोड अन्नधान्य खरेदी केले होते. यावेळी 8500 रुपयांचे अन्नधान्य खरेदी केले. जे शेतकऱयांचे नेते बनले आहेत ते जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनी शेतकऱयांसाठी काय केले?, त्याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा टोला शरद पवारांना लागवत मोदीजी म्हणाले, तांदळाचे भाव पडले होते. तेव्हा शासनाने भाव मिळवून दिला. साखरेचे उत्पन्न वाढले आहे, त्यासही भाव मिळवून दिला आहे. यावर्षी पाऊस कमी आहे, दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात दुष्काळ निर्मूलनाचे काम करत असून त्यांना केंद्राकडून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

सहपालकमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱयांच्या हिताचे निर्णय राज्यात घेतले जात आहेत. स्वामिनाथन आयोग लागू करण्यात आला आहे. शेतकऱयांचा कोणताही प्रश्न लटकत ठेवला गेला नाही, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर म्हणाले, सातारा जिह्यात एकही आमदार, खासदार भाजपाचा नाही, परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपचा खासदार, आमदार होणारच. तरीही जिह्यात 2284 बुथप्रमुख आहेत. स्व. लक्ष्मणराव इनामदार यांची ही भूमी असून तुमची आतुरतेने सातारकर वाट पहात आहेत. तुम्ही साताऱयाला कधी येत आहात, अशी विनंती केली.

 कोरेगावच्या आरती देवरे यांनी शेतकऱयांप्रश्नी विरोधक अफवा पसरवत आहेत. त्यास उत्तरे कशी द्यायची, असा प्रश्न थेट मोदींना केला. त्यावर उत्तर मोदींजीनी दिले.