|Thursday, June 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुण्यवंत पाताळ लोकीं नेला

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला 

भ्रमरगीतांत राधिका पुढे म्हणते-हे भ्रमरा! दूताने काय केले पाहिजे, हे तू श्रीकृष्णांच्याच कडून शिकून आला आहेस, हे मला माहीत आहे. परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपला पती, पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले, त्या आम्हाला ते कृतघ्नपणे सोडून निघून गेले. अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी? अरे ए मधुकरा! त्यांचा जेव्हा रामावतार होता, तेव्हा त्यांनी कपिराज वालीला व्याधाप्रमाणे लपून मारले. शूर्पणखा त्यांची कामना करीत होती, परंतु त्यांनी पत्नीप्रेमामुळे त्या बिचाऱया स्रीचे नाक कान कापून तिला कुरूप केले. कावळा जसा बळी घालणाऱयाचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो, त्याप्रमाणे बलीकडून वामनरूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुणपाशाने बांधून पाताळात ढकलले. म्हणून या काळय़ाशी आता मैत्री पुरे झाली. परंतु काय करणार? आमची इच्छा नसली तरी आम्ही त्यांच्याविषयीच्या गोष्टी टाळू तर शकत नाही ना!  भगवंताशी असे प्रेमाचे भांडण करण्याचा अधिकार भक्तांनाच आहे. संतांच्या अभंगातही असे अभंग आपल्याला वाचायला मिळतात. संत जनाबाईचा हा सुप्रसिद्ध अभंग पहा-

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।  चोरटय़ाचा बहुमान वाढविला। कीर्तिवानाचा अपमान केला।  धुंद झाला तुझा दरबार। वैरियासी दिधली मोक्षसिद्धि। कपटिया दिधली महानिधी। सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी। चाळकासी त्रेलोक्मय भावें बंदी। पतिव्रता ती वृथा गुंतविली। वेश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली । सत्ववानाचा बहु केला छळ ।  कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ।  राधिका भ्रमराला पुढे म्हणते-श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात, त्यांची राग द्वेषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखेच होतात. एवढेच काय, पण पुष्कळसे लोक आपला दु:खमय प्रपंच तत्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणाऱया हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात. आमचीही अवस्था अशीच झाली आहे. जशा काळविटाच्या भोळय़ा माद्या हरिणी, कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या बाणांनी विद्ध होतात, त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रेयसी गोपीसुद्धा त्या कपटी कृष्णाचे गोड गोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्यांच्या किंचित स्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो. म्हणून हे उपमंत्र्या! आता तू त्यांच्याशिवाय दुसरे काहीही सांग! हे प्रियतमाच्या सख्या! तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते. आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठविले काय? प्रिय भ्रमरा! तू आम्हाला आदरणीयच आहेस, म्हणून तुला जे पाहिजे ते माग. अरे! ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण, अशा आम्हाला येथून तेथे नेऊन काय करणार आहेस?

Ad.  देवदत्त परुळेकर