|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » घरोघरी दीक्षितांच्या चुली

घरोघरी दीक्षितांच्या चुली 

आमचा बालमित्र हरिदास हा बकासुरच आहे. दुसरा मित्र नागजंपी ऊर्फ नाग्या कद्रूतम आहे. वजन घटवण्यासाठी सध्या तो दीक्षितांचा डायट प्लान अमलात आणतोय. परवा सकाळी अचानक हरिदास त्याच्या घरी प्रकट झाला.

“नाग्या, आहेस काय रे घरात?’’

“आहे की. आज अचानक कसं काय आलंस? तुझं दीक्षित डायट चालूच आहे नं रे?’’ .

“डायट चालू आहे. पण आमची ही सकाळीच माहेरी गेलीय. तेव्हा म्हटलं, आजचं पहिलं जेवण तुझ्याकडे करावं.’’

“एकदम चुकीच्या वेळेला आलंस, आत्ताच आमचं जेवण झालं. सखुबाई भांडी घासून देखील गेलं. हे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र किंवा-’’

“पर्यायी वाक्प्रचार मला ठाऊकाय. सांगू नकोस. चल मी निघतो. वहिनी कुठंयत?’’

“ती स्वयंपाकघरात टीव्ही बघतंय. काय सांगू? आमचं नंदिनी सध्या कट्टर भाजपा झालंय. म्हणून दुसरं टीव्ही घेतलं. स्वयंपाकघरात ते झीटीव्ही, रिपब्लिक बघतंय. बाहेर मी एनडीटीव्ही बघतंय. आपलं ते रविशकुमार, तिचं ते अर्णव गोस्वामी. शेवटी संसार म्हणजे काय ते अं… अं… काहीतरी असतंय बघ.’’

“दीक्षित डायटमुळे सेव्हिंग झालं की नाही?’’

“थोडं साखरेचं खर्च कमी झालं. मधल्या वेळेतलं चहा-नाष्टा बंद. सखुबाईला काम कमी पडतंय. तिला मी बोललं की पैसे कमी कर. ती म्हटलं चार दिवस दीक्षितचं नि चार दिवस दिवेकरचं. तुमचा काय भरोसा नाय. आता तुझं काय ते बोल. तुझं बायको अचानक माहेरी का गेलं? दीक्षित डायटमुळे तुला सकाळी-संध्याकाळी एकदम जास्त पोळय़ा कराव्या लागतंय म्हणून कंटाळून गेलं काय?’’

“नाही रे. हल्ली मी कमी खातो. पण तिला माझा संशय येतो. पूर्वी तिला संशय यायचा की मी चोरून सिगारेटी ओढतो, ऑफिसातल्या बायकांशी भानगडी करतो. आता ते बदललंय. घरात दीक्षित डायट सांगून मी गुपचूप बाहेर दिवेकरगिरी करतो असा तिला संशय येतो. आज पण ती माहेरी जाते असं सांगून गेलीय. पण ती सोसायटीत लपली असणार आणि मी कुठं हॉटेलात जातो का हे बघण्यासाठी माझा पाठलाग करीत असणार.’’

“बरोबर असतंय तुझं संशय. तुझं बायको आत माझ्या बायकोशी गप्पा मारतंय. चल, हात धू. आपण सगळे जेवायला बसू.’’