|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गवारेडय़ाच्या हल्ल्यात दोघे जखमी

गवारेडय़ाच्या हल्ल्यात दोघे जखमी 

कुडासे येथील घटना : महिन्यापासून गवारेडय़ाचा धुमाकूळ

वार्ताहर / दोडामार्ग:

कुडासेवानोशीवाडी येथील फ्रान्सीस कुस्तान फर्नांडिस (21) त्याचा भाऊ कामील फर्नांडिस (19) दोघे कामानिमित्त दुचाकीने दोडामार्गला येत असता कुडासे रस्त्यावर गवारेडय़ाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. या घटनेत दोघेही भाऊ दुचाकीसह गटारात पडले. यामध्ये दोघांनाही इजा झाली असून त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्रान्सीसच्या पायाचे हाड पॅक्चर झाल्याचे डॉ. ऐवळे यांनी सांगितले. या घटनेबाबत दोडामार्ग वनविभागाला माहिती देण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी सांगीतले.

कुडासावानोशीवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून गवारेडा धुमाकूळ घालत आहे. आठ दिवसांपूर्वी याच मार्गावर या गवारेडय़ाने गोव्यातील एका चारचाकी वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कुडासे येथे दोघा भावांवर या गवारेडय़ाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुचाकीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

आर्थिक मदतीची मागणी

गवारेडय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या फर्नांडिस कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने दोघांनाही शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.