|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समविचारी पक्ष एकत्रित लढणार

समविचारी पक्ष एकत्रित लढणार 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची माहिती : 80 टक्के जागांची निश्चिती : सिंधुदुर्गरत्नागिरी मतदारसंघ काँग्रेसकडेच

जर कोणी पक्षात येत असेल माझा निर्णय आवश्यक आहे. पण राणेंच्या घरवापसीबाबत काहीच माहिती नाहीअशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

वार्ताहर / सावंतवाडी:

महाराष्ट्रात काँग्रेसराष्ट्रवादी आघाडी शेकाप, बहुजन विकास आघाडी, आरपीआय अशा सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा विधानसभा निवडणुका लढविण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. जवळपास 80 टक्के जागांची निश्चिती झाली आहे. येत्या महिनाअखेर होणाऱया राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उर्वरित जागांची निश्चिती होणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सिंधुदुर्गरत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढविणार आहे. मात्र, भाजपचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कोणताच प्रस्ताव नाही. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी आपण सोमवारीच चर्चा केली. त्यांनी आपण तसे काही बोललो नव्हतोच, असे सांगितल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, खासदार हुसेन दलवाई, सुभाष चव्हाण, विकास सावंत, कका कुडाळकर, पुष्पसेन सावंत, बाळा गावडे, रवींद्र म्हापसेकर, बाळा जाधव, डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू मसुरकर उपस्थित होते.

राज्यात बॉम्बचे कारखाने!

चव्हाण पुढे म्हणाले, सध्या देशात भाजपने जनतेचे हाल केले आहेत. घोषणांचा पाऊस पाडण्याशिवाय भाजपसेनेकडून काहीच घडत नाही. रोजगाराचा प्रश्न आज गंभीर झाला आहे. 16 टक्के मराठा आरक्षणाचा विषयही मार्गी लागत नाही. पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर आहे. राज्यात बॉम्ब बनविण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. अशा प्रवृत्तीला सरकारची मूक संमती आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतून देशात राज्यात परिवर्तन घडेल. आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

राणेंच्या वापसीबाबत कल्पना नाही!

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये रमत नाहीत. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, मला याची काहीच कल्पना नाही. जर कोणी पक्षात येत असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा निर्णय आवश्यक आहे. मी आणि प्रदेश कार्यकारिणी यावर चर्चा करतो. पण राणेंच्या घरवापसीबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. थोरात यांना विचारले असता त्यांनी आपण तसे काही बोललोच नव्हतो, असा खुलासा केला आहे.

कर्नाटकातील प्रकार लोकशाहीला काळिमा!

चव्हाण म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजप लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम करता आहे. फोडाफोडी करून पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांचे स्वप्न साकार होणार नाही.

आमदार राणे यात्रेत सहभागी होतील!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, जनसंघर्ष यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे. कोकणच्या यात्रेत कणकवलीचे आमदार नीतेश राणे हे कणकवलीत सहभागी होतील. नाणार प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे. प्रकल्प नके असेल तर प्रकल्प लादता कशाला, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेची नाणारवर दुटप्पी भूमिका

प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, शिवसेनेची नाणार प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका आहे. नाणारला एकीकडे विरोध आणि त्यांचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष नगरसेवक समर्थन करत आहेत. ही भूमिका वेगळी कशी, असा सवाल त्यांनी केला.

नगराध्यक्ष साळगावकर यांनी घेतली भेट

दरम्यान, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पर्णकुटी विश्रामगृहावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेत त्यांना कोकणातील रोजगाराच्या मुद्यावर निवेदन दिले. यात आपण लक्ष घालू, असे चव्हाण म्हणाले. यावेळी बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर उपस्थित होते.