|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय अर्थव्यवस्था येणार 5 व्या स्थानी!

भारतीय अर्थव्यवस्था येणार 5 व्या स्थानी! 

ब्रिटनला मागे टाकणार : जागतिक सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसीकडून अहवाल सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय अर्थव्यवस्थेने दोन वर्षापूर्वी फ्रान्सला पिछाडीवर टाकत जगात सहाव्या स्थानी मान मिळविला होता. चालू आर्थिक वर्षात ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर भारतीय अर्थव्यवस्था येण्याची शक्यता आहे. याबाबत जागतिक सल्लागार कंपनी ‘पीडब्ल्यूसी’ने एका अहवालातून हे भाकित वर्तविले आहे.

विकास आणि लोकसंख्या यामुळे ब्रिटनसह फ्रान्सने अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात विकास केला आहे. मात्र, या दोन्ही अर्थव्यवस्थांना मागे टाकत भारत पुढे जाणार असून अर्थव्यवस्थेतील विकास दीर्घकालीन असेल, असे अहवालात म्हटले आहे. 2019 मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि भारत यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर अनुक्रमे 1.6 टक्के, 1.7 टक्के आणि 7.6 टक्के राहणार असल्याची शक्यता पीडब्ल्यूसी च्या वार्षिक अर्थव्यवस्था आढावा अहवालातून स्पष्ट करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकत पाचव्या स्थानावर येण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे. यामुळे ब्रिटन सातव्या स्थानावर जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार फ्रान्सला मागे टाकत 2017 मध्ये भारताने जगातील सहाव्या स्थानावरील अर्थव्यवस्था बनण्याचा मान संपादन केला होता. वार्षिक अर्थव्यवस्था आढाव्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीत भर देण्याबरोबर जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या कामगिरीवर कटाक्ष टाकण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेच्या वेगात घट…

दरडोई जीडीपीच्या स्तरात झालेली घसरण आणि मोठय़ा प्रमाणात वाढत असणारी लोकसंख्या यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुस्त होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग घटण्याची शक्यता असल्याचे पीडब्ल्यूडीच्या अहवालात म्हटले आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांनी 2016 च्या शेवटी आणि 2018 च्या सुरुवातीस जो वेग घेतला होता, त्यात आता घट झाली आहे. 2017 मध्ये भारताने 2590 अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सहाव्या अर्थव्यवस्थेचा मान पटकाविला होता तेव्हा फ्रान्सचा एकूण जीडीपी 2580 अब्ज डॉलर होता.