|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » यात्रेकरुंची होडी उलटून 8 जणांना जलसमाधी

यात्रेकरुंची होडी उलटून 8 जणांना जलसमाधी 

अरबी समुद्रातील कूर्मगड बेटावरील दुर्घटना

प्रतिनिधी/ कारवार

अरबी समुद्रातील कूर्मगड बेटावरील श्री नृसिंह मंदिराची यात्रा आटोपून येणाऱया भाविकांची होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर अन्य नऊ व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे. होडीतून 25 ते 30 यात्रेकरू प्रवास करीत होते त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता ही दुर्घटना घडली.

समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या यात्रेकरुंचा शोध घेण्यासाठी भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर, भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आणि किनारपट्टी रक्षण पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे. अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली असून ही मोहीम मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, होडीतून प्रवास करणाऱया भाविकांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्ती कोप्पळ, मुंबई आणि स्थानिक आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, एक बालक व पाच महिलांचा समावेश आहे. वाचविण्यात आलेल्या व्यक्तींवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयुमध्ये हलविण्यात आले आहे.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींची नावे- संदेश पेडणेकर (रा. मुंबई), जयश्री कोठारकर, गणपती कोठारकर (दोघेही रा. कडवाड, ता. कारवार), अण्णक्का इंगलकर (रा. कोप्पळ) अशी आहेत. इतरांची अद्याप ओळख पटलेली नाही. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची नावे नवीन पालनकर (वय 33), नेहा निलेश पेडणेकर (वय 35), राधा कृष्णा हुलसवार (वय 56), वैभव विनोद रायकर (वय 21), महेश शेट (वय 35), आदर्श शिरोडकर (वय 18) आणि दर्शन शिरोडकर (वय 27) अशी आहेत.

होडी दुर्घटनेतून सुरेश नाईक, अनमोल नेतलकर, श्रीनिवास बांदेकर (वय 22), गणेश परशुराम (वय 8) सुखरूपपणे बचावले आहेत. तर श्रेयस नावाची व्यक्ती  बेपत्ता झाली आहे.

या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथून पाच-सहा किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कूर्मगड बेट आहे. या बेटावर श्री नृसिंह मंदिराची यात्रा प्रत्येक वषी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी होत असते. या यात्रेत कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि केरळसह दक्षिण भारतातील अन्य राज्यातील हजारो भाविक सहभागी होत असतात. समुद्रातील यात्रा म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी कूर्मगडावर समुद्रमार्गे होडीतूनच जावे लागते. यात्रेकरुंसाठी येथील कोडीबाग, बैतखोल, मुदगा आणि अंकोला तालुक्मयातील बेलेकेरी बंदरातून मच्छीमारी बांधव शेकडो मच्छीमारी होडय़ांची व्यवस्था करतात. काही अन्य होडय़ाही यात्रेकरुंची ने-आण करीत असतात.

देवबाग ऍडव्हेंचर्स बोटिंग सेंटरच्या मालकीची होडी यात्रेकरुंना कूर्मगड बेटावरून कारवारच्या दिशेने घेऊन येत असताना कारवार आणि कूर्मगडाच्या दरम्यान अरबी समुद्रात उलटली. या दुर्घटनेत आठ जणांनी आपला जीव गमावला आहे. काही जणांना वाचविण्यात यश आले. तथापि, मृतांची संख्या वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. होडीतून सुमारे 25 ते 30 यात्रेकरू प्रवास करीत होते, असे सांगण्यात येत आहे. होडीतील यात्रेकरुंची संख्या नेमकी किती होती आणि होडी उलटण्याचे नेमके कारण याबद्दलही काही समजू शकले नाही. होडीचा चालक व्यावसायिक होता. त्यामुळे त्याला होडी हाकण्याचे बारकावे माहीत होते, असे सांगण्यात येत आहे. कारण तो नेहमीच कूर्मगडावरील रिसॉर्टसाठी प्रवाशांची समुद्रामार्गे ने-आण करीत होता, असे सांगण्यात आले. त्यामुळे होडीत क्षमतेपेक्षा अधिक यात्रेकरू असल्यामुळे किंवा काळीनदी अरबी समुद्र संगमावर होडी वाळूत रुतल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार रुपाली नाईक आणि त्यांच्या

समर्थकांनी बुडणाऱयांना वाचविले

कारवारच्या आमदार रुपाली नाईक, कारवारचे माजी नगराध्यक्ष गणपती नाईक आणि अन्य काही जण यात्रा आटोपून परतत असताना त्यांच्या होडीपासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली. त्यामुळे आमदार नाईक आणि इतरांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेऊन काहींना वाचविले आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

जिल्हाधिकारी एस. एस. नकुल, जिल्हा पोलीसप्रमुख विनायक पाटील आणि अन्य वरि÷ अधिकाऱयांनी तातडीने मदतकार्याला वाहून घेतले. समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय नौसेनेच्या हेलिकॉप्टरची, भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाची आणि किनारपट्टी रक्षण दलाची मदत घेण्यात आली.

नागरिकांची प्रचंड गर्दी

दुर्घटनेचे वृत्त वाऱयासारखे पसरले आणि कोडीबाग धक्क्मयावर, बैतखोल बंदरात आणि येथील सागरदर्शन मंगलकार्याच्या पाठीमागील बाजूच्या समुद्रकिनाऱयावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सुरुवातीला मृतांचा आकडा दोन सांगितला जात होता. तो वाढत जाऊन आठ इतका झाला. तर काहींच्या मते या दुर्घटनेत किमान 15 ते 20 व्यक्तींनी जीव गमावला आहे, असे सांगितले जात होते. होडीतून नेमके किती यात्रेकरू प्रवास करीत होते, हे समजल्यानंतरच मृतांचा आकडा स्पष्ट होणार आहे.

जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी

 जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हजारो नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यावेळी जिल्हा रूग्णालयात वाहने ठेवायला जागा नव्हती. कारवारचे आमदार रुपाली नाईक, जि. पं. सदस्या चैत्रा कोठारकर, जि. पं. सदस्या पंढरीनाथ मेथा आणि बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रूग्णालयात आवारात ठाण मांडून होते. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मंत्री आर. व्ही. देशपांडे कारवारात दाखल

या दुर्घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पालकमंत्री आणि महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी कारवारमध्ये दाखल होऊन जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. उपचार घेत असलेल्या यात्रेकरुंना धीर दिला. यावेळी देशपांडे यांनी डॉक्टरांना महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे सांगण्यात आले. यावेळी कारवार जिल्हा पंचायत अध्यक्षा जयश्री मोगेर उपस्थित होत्या.

मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत

आर. व्ही. देशपांडे यांनी दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.