|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑनलाईनद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

ऑनलाईनद्वारे फसवणुकीचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ बेळगाव

ऑनलाईनद्वारे फसवणुकीचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. फसवणुकीसाठी विविध युक्त्या वापरण्यात येत आहेत. सोमवारी संभाजी रोड, वर्धाप्पा गल्ली, खासबाग येथील एका युवकास ऑनलाईनद्वारे फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. लकी ड्रॉमध्ये तुम्ही विजेते ठरला असून टाटा सफारी कार देण्यात येणार आहे. यासाठी तुमच्या बँक खात्यात साडेबारा हजार रुपये तात्काळ भरावे लागणार आहेत, असे सांगण्यात आले. तसेच कारऐवजी साडेबारा लाख रुपये घेऊ शकता, असेही फोनद्वारे सांगण्यात आले. मात्र, युवकाने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच फोन करणाऱया इसमाला जाब विचारला.

सदर युवकास शॉपक्ल्यूज ऑनलाईन शॉपिंग प्रा. लि., नवी दिल्ली या पत्त्यावरून मोबाईलद्वारे पत्रक स्वरुपात बक्षीस मिळाल्याची माहिती पाठविण्यात आली आहे. आपल्या कंपनीच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त लकी ड्रॉ काढण्यात आला असून तुम्ही टाटा सफारी कारचे विजेते ठरला आहात. यासाठी तुम्हाला साडेबारा हजार रुपये खात्यात भरावे लागतील, असे सांगून अधिक माहितीसाठी कंपनीचे पीआरओ अश्वीनकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पत्रकाच्या शेवटी अभिषेक मित्तल व्यवस्थापकीय संचालक असे नमुद असून स्वाक्षरीही करण्यात आली आहे. सदर इसमास 8929744523 या क्रमांकावरून संपर्क साधून कन्नडमधून संभाषण करण्यात येत आहे. तसेच रक्कम भरण्यास मंगळवार अखेरची तारीख असल्याचे सांगण्यात आले आहे.

टाटा सफारी कारऐवजी साडेबारा लाख रुपयांची ऑफरही यामध्ये देण्यात आली असून सदर युवकाच्या नावाने साडेबारा लाखाचा धनादेशाचा नमुना मोबाईलद्वारे पाठविण्यात आला आहे. मात्र, या धनादेशावर तारीख नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट आहे. सदर युवकाने काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शॉपिंगद्वारे जिन्स पॅन्ट खरेदी केल्या होत्या. यावेळी आपले नाव तसेच पत्ता, संपर्क क्रमांक नमुद केला होता. याआधारेच फसवणुकीसाठी हा प्रयत्न झाला आहे. युवकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न विफल झाला आहे. मात्र, आजही ऑनलाईनद्वारे फसवणुकीचे प्रकार विविध मार्गाने सुरू आहेत. यासाठी अशा प्रकारचे फोन आल्यास नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.