|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि.पं.सीईओ डॉ.राजेंद्र के.व्ही.यांनी स्वीकारली सूत्रे

जि.पं.सीईओ डॉ.राजेंद्र के.व्ही.यांनी स्वीकारली सूत्रे 

प्रतिनिधी/ बेळगाव

जिह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेटी देऊन तेथील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शुद्ध पाणी पुरवठा केंद्रे सुरू करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यावर आपले लक्ष राहणार आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती जिह्यातील शेवटच्या ग्राम पंचायतीपर्यंत पोहचावी, ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने आपले प्रयत्न राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी दिली. सोमवारी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारून प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

रामचंद्रन आर. यांची बागलकोट जिल्हाधिकारीपदी बढतीवर बदली झाल्याने डॉ. राजेंद्र के. व्ही. यांची बेळगाव जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोमवारी त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. 2013 बॅचचे आयएएस अधिकारी असणारे डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी या आधी बळ्ळारी जिल्हा पंचायतीचे सीईओ म्हणून सेवा बजावली आहे. शनिवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश आला. सोमवारी त्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी जिह्यात नरेगा योजना प्रभावीपणे राबविण्यावर आपला भर  असल्याचे सांगितले.

ग्रा. पं. पीडिओबाबत अनेक तक्रारी असल्याने त्यांच्यावर कारवाई हाती घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितले. मात्र, अशा पिडीओंना सक्त सूचना करण्यात येणार असून सरकारच्या विविध योजनांची माहिती जिह्यातील शेवटच्या ग्रा. पं. पर्यंत पोहोचविण्यासाठी पिडीओंनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा हा राज्यातच सर्वात मोठा जिल्हा असल्याने सर्व तालुक्यात वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही. यामुळे विकासकामे राबविण्यात काही वेळा अडचणी येण्याची शक्यता आहे. तरीही आपण संपूर्ण जिह्यात विकासकामे राबविण्यावर भर देणार आहे. ग्राम वास्तव्यसारखे उपक्रम राबविण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे नूतन सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले.