|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निनावी फोन…शोधकार्य अन् सुटकेचा निःश्वास

निनावी फोन…शोधकार्य अन् सुटकेचा निःश्वास 

 

वार्ताहर/ चिकोडी

येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन 100 या पोलीस खात्याच्या हेल्पलाईनवर सोमवारी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस विभाग, श्वान पथक व बॉम्ब शोधक पथकाच्या कर्मचाऱयांनी तब्बल 2 तास कसून तपासणी केली. पण बॉम्ब न सापडल्याने अफवा असल्याचे सिद्ध झाले. याबाबत अफवा पसरविण्यात आलेल्या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धगौडा यल्लगौडा पाटील रा. केरुर आणि अब्दूलरझाक सय्यद रा. चिकोडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी 10.30 वाजता पोलीस खात्याच्या 100 या हेल्पलाईनवर एक निनावी फोन आला होता. त्यानुसार संबंधित व्यक्तीने बेळगाव जिल्हय़ातील चिकोडी शहरात असणाऱया स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक शाखेत बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यामुळे एकच खळबळ उडाली. सदर फोनची कल्पना बेंगळूर येथे असलेले एएसपी मिथुन कुमार यांना देण्यात आली. यानंतर निपाणीचे सीपीआय संतोष सत्यनायक, चिकोडीचे उपनिरीक्षक संगमेश होसमणी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शहरातील सोमवार पेठ व जयनगर येथील स्टेट बँकेच्या शाखा तसेच जवळच असलेल्या आयडीबीआय व बीके महाविद्यालयानजिक असलेल्या स्टेट बँक ऑफ म्हैसुर या शाखांमध्ये पोलिसांनी धाव घेऊन तेथील कर्मचारी व ग्राहकांना बाहेर काढले.

यानंतर बेळगावहून आलेले बॉम्ब शोधपथक व श्वान पथकाच्या मदतीने सुमारे दोन तासाहून अधिक काळ बॉम्बचा शोध घेण्यात आला. पण बॉम्ब सापडला नाही. पोलिसांना व श्वान पथकांना निराश होऊन परतावे लागले असले तरी ही अफवा असल्याचे समजताच शहरवासियांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. सोमवार हा आठवडय़ातील पहिलाच बँकेतील कामकाजाचा दिवस असल्याने बँकेत ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच अचानक या अफवेमुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. अफवा असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही पोलिसांनी सोमवारी दिवसभर चिकोडीत आवश्यक बंदोबस्त ठेवला होता.

चौकट करणे…

दोघांवर गुन्हा दाखल

केरुर येथील सिद्धगौडा यल्लगौडा पाटील याने चिकोडीतील आपला मित्र अब्दूलरझाक सय्यद याच्या मोबाईलवरून 100 नंबर या पोलीस खात्याच्या हेल्पलाईनवर फोन केला होता. यावेळी त्याने चिकोडीतील बँकेत बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. या अफवेतून ही पळापळ झाल्याचे पहावयास मिळाले. याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी सदर दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.